सामाजिक कार्यकर्त्याने बसवले प्रभागात सीसीटीव्ही

सामाजिक कार्यकर्त्याने बसवले प्रभागात सीसीटीव्ही

पंचवटी । वार्ताहर

चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी आपला प्रभाग सीसीटीव्ही युक्त असावा असे कोणत्याही मतदाराला वाटणे साहजिकच आहे.पंचवटी परिसरातील प्रभाग संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेखाली येत आहे. मात्र,हे सर्व एक सामाजिक कार्यकर्ता स्वखर्चातून करीत असून सीसीटीव्ही लावण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी या कार्यकर्त्याचे कार्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

म्हसरूळ परिसरात अनेकदा चोर्‍या, सोनसाखळी चोरी, हाणामार्‍या, गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न,हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार घडले आहे . यातील काही आरोपी पकडले गेले तर काही अद्यापही फरार असून अधूनमधून आपली दहशत पसरवत असतात, त्यामुळे या प्रभागात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांची होती. मात्र, त्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे .

यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलमहाले यांनी पुढाकार घेतला असून,पेठरोड आणि दिंडोरीरोडवरील हनुमान चौक, कंसारा माता चौक,साई संदेश चौक, म्हसरूळ चौफुली, रिलायन्स चौफुली व छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी परिसरातील चौकात, भाजीबाजारात, रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले असून हे काम लवकरच पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण करण्यात येणार आहे . या सीसीटीव्हीमुळे संपूर्ण परिसरात सुरक्षेचे वातावरण तयार होणार असल्याने स्थानिकांनी या कार्याचे कौतुक केले आहे .

28 सीसीटीव्हीे कार्यरत

म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांशी चर्चा करून मुख्य चौक आणि काही सोसायटी येथे आत्ता पर्यंत 28 सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरु करण्यात आले आहे . येत्या काही दिवसात पहिल्या टप्प्यात शंभर सीसीटीव्ही लावण्याचे काम करण्यात येणार असून संपूर्ण प्रभागात जवळपास पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज असून,ती हळूहळू पूर्ण करण्यात येईल. आजपर्यंत 28 सीसीटीव्ही बसवण्यासाठी जवळपास अडीच लाख रुपये खर्च आला आहे .

प्रभाग क्रमांक एक मधील मेरी-म्हसरूळ परिसरातील चौक तिथे सीसीटीव्ही कॅमेरा ही माझी संकल्पना आहे . पोस्टर बॉय होण्यापेक्षा स्मार्ट आणि प्रॅक्टिकल काम करायला हवे.

- गणेश पेलमहाले,सामाजिक कार्यककर्ता

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com