शेतकर्‍यांना 90 लाखांचा गंडा

बँक सेवकांवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन : आ. बोरसे
शेतकर्‍यांना 90 लाखांचा गंडा

मुंजवाड । वार्ताहर Munjwada-Malegaon

पिककर्जाचे खाते नील करण्याच्या नावाखाली सुमारे 90 लाखाचा गंडा एचडीएफसी बँकेतील (HDFC Bank) अधिकरी, सेवकाने घातल्याचा आरोप बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) फसवणूक झालेल्या 24 शेतकर्‍यांनी केला आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयात (Tehsil Office) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांनी फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांसह बँक अधिकारी, तहसीलदार व पोलीस अधिकारी यांची बैठक घेत फसवणूक प्रकरणी बँक अधिकार्‍यांना धारेवर धरले. येत्या 4 ऑक्टोंबरपर्यंत फसवणूक करणार्‍या अधिकारी, सेवकाविरूध्द गुन्हा दाखल न झाल्यास बँकेसमोरच आंदोलन छेडण्याचा इशारा आ. बोरसे यांनी दिला.

यावेळी फसवणूक (Cheating) झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळेल याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्यात येवून दोषी असलेल्या अधिकारी, सेवकाविरूध्द गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी पठाडे, गांगुर्डे व दिनेश अहिरे यांनी दिले.

सटाणा (Satana) शहरातील मालेगाव (Malegaon) रस्त्यावरील एचडीएफसी बँकेतील कर्मचार्‍याने पीककर्ज (Crop debt) नील करण्याच्या नावाखाली तालुक्यातील चोवीस शेतकर्‍यांना सुमारे नव्वद लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी बँकेच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. मात्र बँक व पोलीस यंत्रणेतर्फे गेल्या महिनाभरापासून टोलवा टोलवी करण्यात येवून म्हणणे ऐकले जात नसल्याने फसवणूक झालेल्या संतप्त शेतकर्‍यांनी आ. दिलीप बोरसे यांची भेट घेऊन गार्‍हाने मांडले.

आ. बोरसे यांनी आज तहसीलदार जितेंद्र इंगळे, पो.नि. अनमूलवार, एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी पठाडे, गांगुर्डे, दिनेश अहिरे व फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांची तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी बिजोटे येथील मनोहर अभिमन जाधव या 7 लाखांची फसवणूक झालेल्या शेतकर्‍याने आपली कैफियत मांडतांना मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगून अश्रू आवरता आले नाहीत.

हे दृश्य पाहून संतप्त झालेल्या आ. बोरसे यांनी बँकेच्या अधिकार्‍यांची उलट तपासणी करून कष्टकरी शेतकर्‍यांची केलेली फसवणूक आपल्याला महागात पडणार असल्याचा इशारा दिला. अधिकार्‍यांचे रॅकेट असून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय देण्याच्या दृष्टीने तत्काळ संबंधित बँक अधिकारी व सेवकांवर गुन्हे दाखल करावेत जेणेकरून तांत्रिक बाबी तपासून त्यांना या चक्रातून बाहेर काढता येईल.

यावेळी बँकेचे अधिकारी व पो.नि. अनमूलवार यांना न्यायालयात शेतकर्‍यांना न्याय मिळेल यासाठी फिर्यादित कोणतीही त्रुटी असता कामा नये अशा सूचनाही आ. बोरसे यांनी दिल्या. बँकेचे वरिष्ठ अधिकारी पठाडे यांनी येत्या 4 तारखेला आवश्यक कागदपत्रे देऊन दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांविरुध्द तक्रार दाखल करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान येत्या 4 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास बँकेच्या कार्यालयासमोर साखळी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेवटी आ. बोरसे यांनी दिला.

फसवणूक झालेले शेतकरी

विश्वनाथ भामरे, रा. फोपीर (7 लाख ), मोठाभाऊ पवार, रा. श्रीपूरवडे (7.50 लाख), विश्वास शेवाळे, रा.पिंगळवाडे (3.80 लाख), हितेश पंडित अहिरे रा. पिंगळवाडे (7 लाख), अरुण वाघ रा. नवी शेमळी (4 लाख), विनायक दामू भदाणे रा. खीरमाणी (3.10 लाख), मनोहर अभिमन जाधव रा. बिजोटे (7 लाख), राजेंद्र दगा गांगुर्डे रा. बिजोटे (5.10 लाख), अनिल कृष्णा जाधव रा. बिजोटे (2.50 लाख), सोपान देवाजी भामरे रा. आव्हाटी (11 लाख ), भालचंद्र सोनवणे रा. आव्हाटी (2 लाख), दीपक दगा भामरे रा. आव्हाटी (1.50 लाख), प्रवीण ठाकरे रा. श्रीपूरवडे (2.50 लाख), संदीप खैरनार, रा. औदाणे (10.75 लाख), आनंदा येसा भामरे रा. आव्हाटी (1.39 लाख), देविदास खैरनार रा. डोंगरेज (7लाख), दत्तात्रय देवरे रा. खर्डे (4.60 लाख).

Related Stories

No stories found.