भुयारीमार्ग दुरूस्तीसाठी जल आंदोलन

भुयारीमार्ग दुरूस्तीसाठी जल आंदोलन

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम Railway Underpass Work चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याने पावसाचे पाणी तुंबत Water Dump असल्याने शहरवासियांचे हाल होत आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी या मागणीसाठी तुंबलेल्या पाण्यात उतरून आम आदमी पार्टीच्या Aam Aadmi Party पदाधिकार्‍यांतर्फे तब्बल साडेतीन तास जल आंदोलन छेडण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनाची प्रशासन यंत्रणेने दखल घेतली नाही. अखेर साडेतीन तासानंतर नायब तहसीलदार रत्नाकर मरकड यांनी आंदोलनकर्त्यांना भुयारी मार्गाचे समस्याप्रश्नी रेल्वे व नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर जलआंदोलन मागे घेण्यात आले. मात्र साडेतीन तास पाण्यात उभे राहिल्याने आआपचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले हे भोवळ येवून रस्त्यावरच कोसळल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.

शहरात रेल्वेगेट असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर वाटत नव्हता परंतु रेल्वे विभागाने रेल्वे गेट बंद केल्यामुळे नांदगाव शहराच्या पूर्व भागात राहणार्‍या हजारो नागरिकांना मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी रेल्वेच्या भुयारी मार्गाची व्यवस्था केली परंतु मूळ आराखड्याला बगल देऊन चुकीच्या पद्धतीने तो उभारण्यात आल्याने संततधार पावसामुळे भुयारी मार्गात पाणी तुंबले असल्याने शहरवासियांना पुन्हा रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे.

त्यामुळे भुयारी मार्गाची समस्या सुटावी यास्तव आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना भुयारी मार्गाच्या पाण्यात उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला होता. त्यानुसार आज सकाळी दहा वाजेपासून त्यांनी विकास गवळी आदींसह पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले. दोन तास उलटून देखील कोणीही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी दखल घेण्यासाठी आले नाही.

सुमारे साडेतीन तासांनंतर नायब तहसीलदार रत्नाकर मरकड या ठिकाणी आले असता त्यांनी आंदोलनकर्त्यांना विश्वासात घेऊन येत्या दोन दिवसात नगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र साडेतीन तास पाण्यात उभे राहिल्यामुळे वडघुले पाण्याबाहेर येवून काही अंतर चालून गेले असतांनाच त्यांना भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्यासोबत असलेले तुषार पांडे, रवींद्र सानप, प्रमोद पगारे, किरण फुलारे, निलेश जाधव आदींनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले.

Related Stories

No stories found.