दिंडोरी, मोहाडीत कोविड सेंटर सुरु करण्यात येणार

विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची घोषणा
दिंडोरी, मोहाडीत कोविड सेंटर सुरु करण्यात येणार

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी शहरात 45 खाटांचे कोविड सेंटर अखेरीस सुरु करण्याचा निर्णय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत घेण्यात आला असून मोहाडी येथील सह्याद्री कंपनीवरही कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तालुक्याच्या करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, दिंडोरीचे पोलिस निरीक्षक अनंत तारंगे, वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजपूत, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ. विलास पाटील यांनी तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा दिला.

सामान्य जनता आणि गाव पुढारी नियम पाळत नसल्याने करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात आले. गाव पातळीवर काम करीत असलेले ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत बैठकीत ताशेरे ओढण्यात आले. ग्रामसेवकांनी चांगले काम केल्यास प्रत्येक गाव करोना मुक्त होवू शकतो अशी सूचना विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ व माजी आमदार धनराज महाले यांनी केली. गावोगावी सुरु असलेले अवैध दारु विक्री आणि दिंडोरीच्या वाईनशॉपीमधून संध्याकाळी होणारी दारु तस्करी यावरही नरहरी झिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

दिंडोरी शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता दिंडोरी शहरात गांधीनगर टेकडीवर असलेल्या वसतीगृहात 45 खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्याची तसेच मोहाडी येथे सह्याद्री कंपनीत 20 खाटांचे कोविंड रुग्णालय सुरु करण्याची घोषणा विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली. यावेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जि. प. सदस्य प्रवीण जाधव, जि. प. सदस्य भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. वाघेरे आदींनी सूचना मांडल्या. बैठकीस नायब तहसीलदार बावीस्कर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ढोकरे, प्राचार्य विलास देशमुख, मनोज शर्मा, विलास कड, शाम हिरे, कैलास मवाळ, अविनाश जाधव, माधव सांळूखे, राजेंद्र उफाडे, प्रितम देशमुख यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com