आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

वडीलांपाठोपाठ दुसऱ्या दिवशी मुलीचे निधन
आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

नाशिक

नाशिक जिल्हा शूटर्सअसोसिएशनची सरचिटणीस व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय युवा नेमबाजसाठी त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झालेली होती. भारतासह श्रीलंकेच्या ही नेमबाजांना त्या प्रशिक्षण देत होत्या. क्रीडा मानसोपचार तज्ञ स्व. भीष्मराज बामसरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा शूटर्स असोसिएशनचे काम सुरु केले होते.

नाशिकला ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे भीष्मराज बाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र , मात्र त्यांच्या जाण्याने हे स्वप्न अर्धवट राहिले आहे. नाशिक जिल्हा शूटर्स असोसिएशनच्या अध्यक्ष शर्वरी लथ यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस पदावरून त्या कार्यरत होत्या. नाशिकने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणारे धावपटू दिले, त्याच नाशिकमध्ये मोनालीच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय नेमबाज घडत होते.

नाशिकमध्ये अनेकांना दिले प्रशिक्षण

मोनाली गोऱ्हे या भारताच्या युवा नेमबाज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक होत्या. तसेच श्रीलंकेच्या नेमबाज संघाच्या त्या प्रशिक्षक सुद्धा होत्या. नेमबाजीच्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी तिच्या नावावर आहे. तिने एक्सएल टार्गेट शुटर्स असोसिएशनची स्थापना करून नाशिकच्या मातीतून नेमबाजीतले अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. गत दशकभराहून अधिक काळापासून मोनाली या त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नाशिकच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य करत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पश्चात आई आणि एक विवाहित बहिण आहे.

वडीलांचे काल झाले होते निधन

इंदिरानगर जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी श्री दत्तगुरु सेवा संस्थांनचे उपाध्यक्ष , संस्थानचे आधारस्तंभ ,खंदे सामाजिक राजकीय कार्यकर्ते तसेच मोनाली गोरे यांचे वडील मनोहर ( बापू) गोऱ्हे यांचे काल रात्री निधन झाले होते. त्यानंतर आज मुलीचे निधन झाले.

छगन भुजबळ यांच्यांकडून श्रद्धांजली

आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे आज कोरोनामुळे दु:खद निधन झाले. आज उपचार सुरु असतांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काही काळातच मोनाली यांची देखील प्राणज्योत मालवली. ही अतिशय दु:खद बातमी आहे. मोनाली गोऱ्हे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक, श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रशिक्षक मोनाली व त्यांच्या वडिलांच्या निधनाने गोऱ्हे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय गोऱ्हे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर मृतांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना करतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com