
सटाणा | वार्ताहर | Satana
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) तालुक्यातील चौंधाणे येथे कार्यक्रमासाठी गेले असता धुळवडच्या निमित्ताने रंग खेळणाऱ्या चिमुकल्यांनी त्यांचे वाहन अडविले आणि त्यांच्या गाडीवर त्या चिमुकल्यांनी रंग फेकला.
हे पाहून, आता आमदार (MLA) काय करतील असा विचार काहींच्या मनात आला, मात्र जे घडले ते पाहून जरा धक्काच बसला.
आमदार बोरसे यांनी चक्क वाहनातून खाली उतरून चिमुकल्यांसोबत धुळवड साजरी केली. यामुळे चिमुकल्यांचा आनंद तर द्विगुणित झालाच पण उपस्थितांनाही आमदार बोरसेंचा हा आस्थेवाईकपणा भावून गेला.
बागलाण मधील चौंधाणे येथे एका कार्यक्रमासाठी ग्रामस्थांकडून आमदार बोरसे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यानंतर तालुकाभरात ठिकठिकाणी भेटी देण्यासाठी निघाले असता रस्त्यात धुळवडनिमित्ताने रंगपंचमी (Rangpanchami) खेळणाऱ्या चिमुकल्यांनी आमदार बोरसे यांचे वाहन अडविले तेव्हा हा प्रकार घडला.
चिमुकल्यांचा आग्रह अव्हेरून तेथून काढता पाय न घेता आमदार बोरसे यांनी चालकास वाहन थांबविण्यास सांगितले आणि चक्क खाली उतरून आमदार बोरसे यांनी चिमुकल्यांसोबत धुळवड खेळली.