रात्रीच्यावेळी सर्रासपणे डिझेल विक्री
नंदुरबार

रात्रीच्यावेळी सर्रासपणे डिझेल विक्री

दिवसा बायोडिझेल पंप बंद असल्याचा फलक : शहादा येथील प्रकार

Ramsing Pardeshi

शहादा - Sahada

बायो डिझेलच्या नावाने इंधन भेसळ करून डिझेलपेक्षाही कमी दरात बायोडिझेल विक्री करण्याचा गोरखधंदा शहाद्यातही सुरूच आहे. शहादा - प्रकाशा रस्त्यावर वीज वितरण केंद्रालगत असलेला हा अनधिकृत बायो डिझेल पंप कारवाईच्या भितीपोटी दिवसा बंद तर रात्री सुरू सुरू राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार या पपंचालकाकडून होत आहे.

नंदुरबार जिल्यात अनेक ठिकाणी बक्कळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी अनधिकृतपणे बायोडिझेल पंप थाटण्यात आले आहेत. शहाद्यातही प्रकाशा रस्त्यावर वीज वितरण कंपनीच्या केंद्रांनजिक प्रशासनाच्या कुठल्याही परवानगीशिवाय बायोडिझेल पंप थाटण्यात आला आहे. अनधिकृत बायोडिझेल पंपाबाबत दै. देशदूतने प्रकाशझोत टाकल्याने जिल्ह्यातील अश्या बायोडिझेल पंपांवर कारवाई करण्यात येऊन असे पंप सील केले गेले तर कारवाईच्या भीतीने काही बायोडिझेल पंप गायब झाले आहेत. त्यामुळेच शहाद्यातील बायोडिझेल पंपही चर्चेत आला आहे. प्रशासनाकडून संभाव्य कारवाईच्या भीतीपोटी शहाद्यातील हा बायोडिझेल पंप दिवसा बंद तर रात्री सुरू राहत आहे.

प्रशासनाला हा पंप बंद असल्याचे दाखविले जात आहे व सदर पंप बंद आहे असे लिहिलेला फलकही या पंपाजवळ लावण्यात आला आहे. मात्र, या पंपावरील परिस्थिती वेगळीच आहे . रात्री हा पंप राजरोसपणे सुरू राहत असून अनेक मोठया ट्रका या पंपावरून बायोडिझेल भरत आहेत. दैनंदिन वापरातील डिझेलपेक्षा २० ते २५ रुपये स्वस्त दरात बायोडिझेल मिळत असल्याने अनेक वाहनधारक या पंपावरील बायोडिझेलचा वापर करीत आहेत. प्रत्यक्षात बायोडिझेलवर वाहने चालूच शकत नसल्याने त्यात कुठल्या इंधनाची भेसळ होते याची चौकशी होणे गरजेचे आहे. बायोडिझेल विक्रीच्या गोरख धंद्यात दिवसेंदिवस वाढच होत असून शासनाला मिळणार्‍या महसूललाही या अनधिकृत बायोडिझेल पंप चालकांकडून चुना लावला जात आहे.

जिल्ह्यात अश्या बायोडिझेल पंपांवर कारवाई होत असताना शहाद्यात मात्र हा गोरखधंदा रात्रीच्यावेळी राजरोसपणे अजूनही सुरूच आहे. गुजरात कनेक्शन असलेल्या या धंद्यात शहाद्यातील या पंपवर रात्रीच्या वेळी बायोडिझेलचे टँकर खाली केले जात असून प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. शासनाची तथा प्रशासनाची परवानगी नसतानाही हा अनधिकृतपणे थाटलेला बायोडिझेल पंप प्रशासनाच्या नाकावर टीच्चून रात्रीच्या वेळी कसा सुरू राहतो याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com