भगदाड पडलेल्या पुलाच्या कठडयावरुन पाणी

धवळीविहिर-हलालपूर दरम्यान असलेल्या भवर नदीला पूर
भवर नदीवरील पुलावर पडलेले भगदाड
भवर नदीवरील पुलावर पडलेले भगदाड

मोदलपाडा । वार्ताहर- TALODA

तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या भवर नदीला पूर आल्यामुळे नदीवरील भगदाड पडलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे...

धवळीविहीर ग्रामस्थांना भगदाड पडलेल्या पुलाच्या कठड्यावरून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणार्‍या भवर नदीवरील पुलाला भले मोठे भगदाड पडले होते. पुलाची उंची कमी असल्याने व गेल्यावर्षी सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे महिनाभर पुलावरून पाणी वाहत होते. अश्या परिस्थितीत या पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड अधिकच धोकेदायक बनले होते. पुलावरील वाहत्या पाण्यात रस्त्याचा अंदाज घेत व त्या भगदाडला चुकवीत धवळीविहीर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी महिनाभर प्रवास केला होतो. दरम्यान, यंदादेखील या सर्व प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.यावर्षीदेखील या पुलावरून पाणी वाहत असून, नागरिकांना पुलावरील हे भगदाड चुकवीत पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

पुलावरील पाण्याचा तीव्र प्रवाह, कमकुवत झालेला पूल व पुलावरील जीवघेणे भगदाड यामुळे या पुलावरून प्रवास करणे ही मोठी जीवघेणी कसरत ठरत आहे. धवळीविहीर गावाला जोडणारा हा एकमेव पक्का रस्ता असून, नदीला आलेल्या पुरामुळे तो बंद झाला आहे. गेल्या वर्षभरापासून या पुलाची हीच स्थिती असून, वर्षभरात कोणत्याही प्रकारच्या दुरूस्तीचे काम झालेले नाही. याबाबत पावसाळ्यात नदीला पूर आल्यास मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणून यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी व आ.राजेश पाडवी यांनी या पुलाला भेट देवून पुलाची पाहणी केली होती.

दरम्यान या ठिकाणी नव्या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लॉकडाऊनमुळे निविदा व अन्य तांत्रिक प्रक्रिया न होऊ शकल्याने कामास सुरूवात करता आली नसल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी या भगदाडमध्ये एक दुचाकीस्वार आपल्या लहान मुलांसह पडला होता. सुदैवाने या अपघात कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. पुलाचे काम तत्काळ करणे शक्य नसले तरी पुलाला पडलेले हे भगदाड पुलावरून पाणी वाहत नसतानादेखील जीवघेणे ठरत आहे.

किमान हे भगदाड बुजवावे, अशी वाहनधारकांची मागणी होती. मात्र तिच्याकडेदेखील पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या सर्व प्रकारामुळे धवळीविहीर ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाला आहे. पुलाला पडलेले हे भगदाड वर्ष उलटले असले तरी तसेच असून यावर्षीदेखील धवळीविहीर ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. धवळीविहीर ग्रामस्थांना तळोदा येथे येण्यासाठी गणेश बुधावल फाटा एक दुसरा कच्चा मार्ग आहे.

परंतु तो रस्ता मातीचा असल्याने सध्या त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने कोणाच्याही उपयोगाचा ठरत नाही. मोटरसायकलसुद्धा त्या मार्गाने व्यवस्थित जाऊ शकत नाही, अशी या रस्त्याची परिस्थिती आहे. यामुळे धवळीविहीर ग्रामस्थ या वाहणार्‍या पाण्यातून व भगदाड पडलेल्या पुलावरून मार्गक्रमण करण्याचा धोकेदायक पर्याय स्विकारत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com