राज्याच्या निधीची प्रतीक्षा

नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राचा निधी मंजूर
राज्याच्या निधीची प्रतीक्षा

गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. दोन वर्षांपुर्वी खर्‍याअर्थाने या महाविद्यालयाला मंजूरी मिळाली. परंतू नंदुरबारसोबत मंजूरी मिळालेले अकोला, गोंदीया, चंद्रपूर, बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु झाले आहेत. मात्र, नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय अद्याप सुरु झालेले नाही. या महाविद्यालयासाठी आता केंद्र सरकारकडून १९५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारचा वाटा असलेला १३० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास या महाविद्यालयाच्या कामास प्रारंभ होणार आहे. परंतू महाराष्ट्रात कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता हा निधी लवकर मिळेल की नाही? निधीच्या मंजूरीवरुन श्रेयाचे राजकारण तर होणार नाही ना? केंद्र विरुद्ध राज्य सरकारच्या राजकारणामुळे पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजत घोंगडे तर पडून राहणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

राकेश कलाल, नंदुरबार ९५५२५ ७६२८४

जिल्हानिर्मितीपासून नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येईल, अशा घोषणा लोकप्रतिनिधी वारंवार करतांना दिसत आहेत. सन २००९ च्या खान्देश पॅकेजमध्ये नंदुरबारला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. परंतू प्रत्यक्षात आज अकरा वर्षांनंतरदेखील सदर महाविद्यालय सुरु झालेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी यावर्षापासून महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, असे जाहीर करण्यात येत आहे. परंतू प्रत्यक्षात कुठलीही हालचाल दिसून येत नाही. दोन वर्षापुर्वी पुन्हा या महाविद्यालयाला अंतीम मंजूरी मिळाली होती. परंतू तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय जळगावला पळविले. नंदुरबारनंतर मंजूरी मिळालेले जळगावचे वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वितही झालेे आहे. मात्र, तेव्हा नंदुरबार जिल्हयातील एकही लोकप्रतिनिधीने आवाज उठविला नव्हता. जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी त्यावेळी विरोध केला असता तर नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून दोन वर्ष झाले असते. त्यावेळी डिनचीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. सध्या दोन तीन कारकुनांंव्यतिरिक्त कोणाचीही नियुक्ती नाही.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी अद्याप केंद्रीय कमिटीकडून ‘फायनल इन्स्पेक्शन’ बाकी आहे. यासाठी दिल्लीची टिम नंदुरबारला येणार होती. परंतू सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही टीम अद्याप आलेली नाही. सदर टीम आल्यानंतर येथील पाहणी करुन प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु होण्यास मंजूरी मिळणार आहे. या महाविद्यालयासाठी केंद्र सरकारने १९५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य सरकारचा वाटा असलेला १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास प्रत्यक्ष या इमारतीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. परंतू राज्यात कोरोनाची सद्यस्थिती पाहता हा निधी लवकर मिळेलच याची शाश्‍वती नाही. मात्र, राज्य सरकारच्या निधीची वाट न पाहता केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून या कामाला प्रत्यक्ष काम सुरु केल्यास महाविद्यालयाच्या इमारतीसह इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहू शकते. हे काम होईपर्यंत दोन तीन वर्षांचा कालावधी लागणारच आहे. दरम्यानच्या काळात राज्याचा निधी मिळाला तरीही या महाविद्यालयाचे काम पूर्णपणे मार्गी लागू शकते. परंतू निधीवरुन राजकारण होवू नये ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कारण श्रेयवादामुळे यापुर्वी नंदुरबार जिल्हयातील अनेक प्रकल्पांना ब्रेक लागले होते. अनेक प्रकल्प पूर्ण होवूनदेखील केवळ श्रेयवादामुळे रखडले होते. अनेक प्रकल्पांचे दोन दोन तीन तीन वेळा उद्घाटन, भुमिपूजन केल्याचे नंदुरबार जिल्हावासीयांनी पाहिले आहे.

परंतू यापुढचा काळ कठीण राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा केव्हा नायनाट होईल, हे सांगणे कठीण आहे. कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन कमी पडणार आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी हेदेखील कोरोनाबाधीत होत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळ कमी होवू लागले आहे. याठिकाणी डॉक्टर, कर्मचारी कार्यरत असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठा आधार मिळणार आहे. कारण वैद्यकीय महाविद्यालय आल्यास याठिकाणी शंभरावर अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, तज्ञ मंडळींची नियुक्ती होणार आहे. शिवाय याठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची जिल्हयातील रुग्णांसाठी वैद्यकीय मदत होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय ही जिल्हयाच्या दृष्टीने संजीवनी ठरणार आहे. यासाठी राजकारण न करता वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न मार्गी लावणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com