खदानीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू

आंध्रप्रदेशच्या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार
नंदुरबार

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

खदानमध्ये काम करत असतांना दगड, मुरुम व माती अंगावर पडून दोघा मजूरांंचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वरुळ येथे घडली. याप्रकरणी स्वस्तिक इन्फ्रा लॉजिंग प्रायव्हेट लिमीटेड या आंध्रप्रदेशच्या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर व खदान सुपरवायझरविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांना अटकही करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुळ ता.जि.नंदुरबार येथील सर्व्हे नंबर ४९/२/अ/१ब येथील स्वस्तिक इन्फ्रा लॉजिंग प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या खदानमध्ये दि.२७ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भवानी इंद्रदेव तांती (वय २८, रा.सिंधूडीह पोस्ट भैरोगंज चांदन, कटोरीया जि.बांका, बिहार), संजय छकू तांती (वय२९, नोनिया पोस्ट भैरोगंज चांदन कटोरीया जि.बांका बिहार) हे काम करत असतांना त्यांच्या अंगावर दगड, मुरुम व माती पडल्याने त्याखाली दबले जावून दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या खदानीमध्ये पावसाचे पाणी लागून अथवा खडकामधून पाणी झिरपून खदानीचे दगड, मुरुम व माती ढासळून जमीनीवर पडू नये यासाठी योग्य ती उपाययोजना न करता खदानमधील जागा धोकेदायक आहे, असे माहिती असतांनाही मजूरांकडून हयगयीने काम करवून घेतल्यामुळे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर व्यंकटाशास्त्री सुब्रमण्याशी पुल्ले (४४, रा.तिरुम्मलाराव स्ट्रीट गांधीनगर ता.काकीनाडा जि.गोदावरी आंध्रप्रदेश, हमु. तळोदा रोड नंदुरबार) व खदान सुपरवायझर सुरेंद्रसिंग बृजभुषणसिंग (वय ४४, रा.आमिलीया ता.अतिलीय जि.रिवा मध्यप्रदेश) यांना जबाबदार धरुन दोघा मजूरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com