नंदुरबार | प्रतिनिधी -nandurbar

नंदुरबार येथे एनए - डेक्स ॲप डाऊनलोड करण्याचे सांगुन अज्ञाताने एकाच्या खात्यातुन वेळोवेळी ऑनलाईनने पैसे ट्रान्सफर करुन तब्बल तीन लाखात गंडविल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार येथील पटेलवाडीत राहणारे वसंतकुमार नरेंद्रप्रसाद सिंह यांनी ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातुन फ्लिपकार्डद्वारे ब्ल्युटुथ स्पिकर मागविला होता .

या स्पिकरमध्ये पावर बटन काम करीत नसल्याने त्यांनी फ्लिपकार्ड कंपनीला ऑनलाईन तक्रार केली होती . परंतु या तक्रारीचे निवारण होत नसल्याने वसंतकुमार सिंह यांनी बोट कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क केला असता सदरील व्यक्तीने फोन उचलल्यावर दुसर्या क्रमांकावरुन कॉल करतो , असे सांगितले .

त्यानंतर दुसर्या क्रमांकावरुन फोन आल्यावर सदर व्यक्तीने स्पिकरमधील दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईनने फोन पे द्वारे १ रुपयेपाठविण्यास सांगितले . त्यानंतर एनए डेक्स ॲप डाऊनलोड करण्याचे सांगत सदर व्यक्तीने वेळोवेळी वसंतकुमार सिंह यांच्या खात्यातुन २ लाख ९९ हजार ९९४ रुपये परस्पर बँक खात्यातुन ट्रान्सफर करुन वसंतकुमार सिंह यांची ऑनलाईन फसवणुक केली.

याप्रकरणी वसंतकुमार नरेंद्रप्रसाद सिंह यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी पुढील तपास पोनि रविंद्र कळमळकर करीत आहेत.