नंदुरबार । प्रतिनिधी- Nandurbar

नंदुरबार शहरातील घरफोडी व इतर गुन्हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन उघड करण्यात आले असून 4 अल्पवयीन व एक आरोपीतांकडुन 1 लाख 18 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

, दि.12 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नंदुरबार शहरातील मुकुंद ओंकारेश्वर भट्ट (रा.नागाई नगर) यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी घरात दुकानात प्रवेश करुन घरातील 58 हजार रुपयांचे सिलेंडर व इतर घरगुती वस्तु चोरुन नेल्या. याबाबत अज्ञात आरोपीताविरुध्द् उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागाईनगरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे सामान्य जनतेत भितीचे वातावरण निर्माण होवून पोलीसांपुढे आरोपीतांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी स्वतंत्र पथक तयार करुन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री.राजपूत यांना नागाईनगर येथील चोरीचा गुन्हा सिंधी कॉलनी परीसरातील 2 अल्पवयीन मुलांनी केला असून ते सध्या सिंधी कॉलनी येथेच फिरत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार संशयीत सिंधी कॉलनी परीसरातून एका अल्पवयीन संशयीताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आणले. त्याने सदर गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याबाबत कथन केल्याने फरार असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घरातून चोरीस गेलेले 58 हजार रुपये किमतीचे 2 घरगुती सिलेंडर व घरगुती वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलगा व मुद्देमाल उपनगर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.

दि.15 ते 16 फेब्रुवारी 2021 दरम्यान नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणारे राकेश पुना माळी हे बाहेरगांवी गेल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेवून घरात घुसून घरातील कपाटात ठेवलेले 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 60 हजार रुपये रोख व 1 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत माळीवाडा व परीसरातील पुर्वीचे गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या आरोपीतांबाबत माहिती काढून एक स्वतंत्र पथक तयार केले. त्याचदरम्यान माळीवाडा येथील झालेली मोठी चोरी ही चिंचपाडा येथे राहणार्या दोन अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजपूत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने चिंचपाडा भिलाटी येथुन एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिली.

त्याने चोरीस गेलेला एक मोबाईल व 350 रुपये काढून दिले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेला इतर माल त्याच्या साथीदाराकडे लपविण्यासाठी दिल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चिंचपाडा भिलाटी येथे जावुन साथीदाराचा शोध घेतला असतो तो बाहेरगांवी पळुन गेला.

दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परीसरातून बाजाराच्या दिवशी 4 सर्व सामान्य नागरीकांचे मोबाईल हरविले म्हणून सर्व नागरीकांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रार केली. त्यासाठीही एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. 17 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे दोन संशयीत इसम बिल नसलेले महागडे मोबाईल कमी किमतीत विकत आहे, त्यांनी तात्काळ पथकास करण चौफुली येथे जावुन माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. पथकाने करण चौफुली येथून विरेंद्र लखन सिलारे (वय-22 रा. झाडपा ता. हरदा जि. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेतून 60 हजार 500 रुपये किमतीचे 7 महागडे अँड्राईड मोबाईल मिळून आले. एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरचे मोबाईल सुरत गुजरात येथुन विकत आणल्याचे सांगितले. त्यामुळे संशयीत इसम,अल्पवयीन मुलगा व मोबाईल पुढील कारवाईकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व संशयीत 4 मुलांकडुन 1 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 3 गुन्हे उघडकिस आणल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत व त्यांच्या संपुर्ण पथकाचे अभिनंदन करण्यात आले.

सदर कामगिरीपोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, महिला पोलीस नाईक पुष्पलता जाधव, पोलीस शिपाई अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.