कोरोनाबाबत नियमांचे पालन न करणार्‍यांना वर्षभरात अडीच कोटीचा दंड

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे आवाहन
कोरोनाबाबत नियमांचे पालन न करणार्‍यांना वर्षभरात अडीच कोटीचा दंड

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

कोरोना संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणार्‍या व्यक्तींना गेल्या वर्षभराच्या कालावधीत सुमारे अडीच कोटी दंड आकारण्यात आला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांची स्वयंशिस्त आवश्यक असून नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आहे. कोरोना काळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणार्‍यांवर कारवाई होत असताना अनेक ठिकाणी पोलिसांमधल्या माणूसकीचेही दर्शन घडले.

गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृद्ध आणि निराधारांना सहकार्य, नागरिकांना मार्गदर्शनातही पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. या कालावधीत तीन कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि इतर काहींना कोरोनाशी झुंज द्यावी लागली. पण पोलिसांनी आपले कर्तव्य कठोरपणे पार पाडले. लॉकडाऊन असो वा जनता कर्फ्यु, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. नियम तोडणार्‍यांना मार्गदर्शन करण्यासोबत अनावश्यक रस्त्यावर फिरणारे, मास्क न घालणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणारे, संचारबंदी मोडणार्‍यांविरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाईदेखील केली.

जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांतर्गत कोविड नियमांच्या उल्लंघनाबाबत ६ हजाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ६ हजार ६१७ व्यक्तिंकडून ३१ लाख २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न लावणार्‍या २६ हजारपेक्षा अधिक नागरिकांना ६० लाख ५६ हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या १ लाख २१ हजार ९५१ प्रकरणात १ कोटी ५४ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३९ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे.

पोलीस हा नागरिकांचा मित्र आहे. कोरोनाचे संकटामुळे प्रत्येकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व मिळूनच कोरोनावर मात करता येईल. नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याने यापुढेदेखील नियमभंग करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलीस मित्र म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री.पंडीत यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com