शतकोत्तर वर्षांची हरिहर भेटीची परंपरा खंडीत
नंदुरबार

शतकोत्तर वर्षांची हरिहर भेटीची परंपरा खंडीत

श्री दादा व श्री बाबा नंदुरबार शहरातील मानाचे गणपती

Ramsing Pardeshi

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, जगावरील कोरानाचे संकट दूर करा अशा जयघोषात आज नंदुरबार जिल्हयात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.

यंदा कुठलाही जल्लोष न करता अगदी साध्या पद्धतीने श्री विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. नंदुरबार शहरातील मानाच्या श्री दादा व श्री बाबा गणपतींची अवघ्या राज्यात आकर्षण असलेली ‘हरिहर भेट’ ही यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने शतकोत्तर वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.

Baba Ganapati
Baba Ganapati

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरासह जिल्हयात गणेशोत्सव यंदा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोणताही जल्लोष, आरास, ढोलताशांच्या गजर, गुलालाची उधळण या गणेशोत्सवात दिसला नाही. नंदुरबारचा गणेशोत्सव अवघ्या राज्यात प्रसिद्ध आहे. नंदुरबारमधील श्री विसर्जन मिरवणूका हे या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. यापुर्वी श्री विसर्जन मिरवणूका 36 ते 40 तासांपर्यंत सतत ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत चालल्याची नोंद आहे.

Dada Ganapati
Dada Ganapati

मात्र, गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रात्री दहा वाजेनंतर वाद्य वाजविण्यावर बंदी आल्यानंतर या मिरवणूकांचा कालावधी कमी होत गेला. त्यातच नंदुरबारातील मानाच्या श्री दादा व श्री बाबा गणपतींची ‘हरिहर भेट’ही देखील आकर्षण असते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मानाच्या श्री दादा गणपतीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरुन नेण्यात येते. रात्री 9 च्या सुमारास शहरातील जळका बाजार परिसरात मानाच्या श्री बाबा गणपतीसोबत हरिहर भेट होत असते. यावेळी ढोलताशांचा प्रचंड गजर करण्यात येतो. फुले व गुलालाची उधळण करण्यात येते.

गणेशभक्त बेधुंद होवून नाचत असतात.गणेश मंडळ पदाधिकारी एकमेकांच्या गणेशाची आरती करतात. त्यानंतर श्री. दादा गणपती, श्री. बाबा गणपती, व इतर मानाचे व गणेश मंडळांचे गणपती यांचा रांगा लागत असतात. यावेळी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी असते. तसेच जल्लोष व उत्साह असतो.

शहरातील सोनी विहिरीत सर्वप्रथम श्री दादा गणपती, त्यानंतर श्री. बाबा गणपतीचे विसर्जन करण्यात येते. इतर गणपती मात्र प्रकाशा येथील तापीपात्रात किंवा अन्य ठिकाणी विसर्जन करण्यात येते.

परंतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मिरवणुकांवर बंदी होती. त्यामुळे कुठलाही ढोलताशांचा गजर न करता, गुलालाची उधळण न करता अगदी साध्या पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. सकाळी 9 वाजता श्री दादा गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

दरवर्षी श्री दादा व श्री बाबा गणपतींची रथावरच मिरवणूक काढण्यात येते. परंतू यंदा ही परंपरादेखील खंडीत होवून प्रथमच डंपरमध्ये दोन्ही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ‘हरिहर भेट’ ही रद्द झाल्याने शतकोत्तर वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.

दादा गणपतीची मिरवणूकही शहरातील प्रमुख मार्गांवरुन न काढता सरळ सोनी विहिरीपर्यंत नेण्यात आली. अवघ्या एक ते दीड तासाच्या मिरवणुकीनंतर श्री दादा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री बाबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

अन्य सर्व गणेश मंडळे, मानाचे गणपती यांच्या गणपतींचे विसर्जन नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात तसेच शहरातील शिवण नदी, पातालगंगा नदीवर विसर्जन करण्यात आले. एकुणच यंदाचा गणेशोत्सव जल्लोषाविना साजरा करण्यात आला. गणरायाला निरोप देतांना गणेशभक्तांनी कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com