जिल्हृयात 23 नोव्हेंबरपासून वाजणार शाळेची घंटा

जिल्हृयात 23 नोव्हेंबरपासून वाजणार शाळेची घंटा

मोदलपाडा, ता.तळोदा वार्ताहर modalpada

तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा उद्या दि. 23 नोव्हेंबरपासून वाजणार आहे. शाळा सुरू करण्यासाठीची संपुर्ण तयारी शाळा व्यवस्थापनाने केली आहे.

दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली असली तरी अद्याप बर्‍याच शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने तसेच बर्‍याच शिक्षकांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत शिक्षकांसह विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.

कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. मात्र, आता राज्य शासनाने शाळा सुरु करण्यास परवानगी दिल्याने उद्या दि. 23 नोव्हेंबरपासून जिल्हयातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, तत्पुर्वी सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार बर्‍याच शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. शाळेची साफसफाई स्वच्छता केली जात आहे. आठ महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना ही शाळेची उत्सुकता लागली आहे. घरी ऑनलाइन शिक्षण घेऊन विद्यार्थी कंटाळले होते. आता मात्र विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे घेणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क लावून व सामाजिक अंतर ठेवून वर्गात बसावे लागणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी पालकांची लेखी संमती असणे आवश्यक आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी याबाबत चर्चा करावी लागणार आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांना शाळेत पाठवू नयेत असेही निर्देश देण्यात आले आहेत. सामाजिक अंतर राखण्यासाठी शाळेत येणे व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात येणार आहेत शाळेतील परिपाठ स्नेहमिलन क्रीडा व इतर कार्यक्रमावर बंदी असणार आहे. वर्गखोल्या तसेच शिक्षकांची बैठक व्यवस्था ही सामाजिक अंतरावर असणारा हा वर्गामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असणार आहे. अनेक शिक्षकांची आर.टी.पी.सीआर तपासणी करण्यात आले आहे. बहुतांशी शिक्षकांचा अहवाल येणे अजून बाकी आहे. तर बर्‍यापैकी शाळेतील शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पालक व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच संबंधित शिक्षक कोणा कोणाच्या संपर्कात आलाय याबाबत विचारपूस सुरू आहे. त्या अनुषंगाने अनेक पालक आपल्या पाल्याना शाळेत पाठविण्याबाबत नकार देत आहेत.

एक दिवसाआड येतील विद्यार्थी

नंदुरबार । प्रतिनिधी-

शाळा सुरु करण्यासंदर्भात खान्देशात फक्त नंदुरबार जिल्हयाने अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे उद्या दि.23 नोव्हेंबरपासून जिल्हयातील माध्यमिक शाळांचे वर्ग सुरु होणार आहेत. जिल्हयात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शाळा सुरु करण्यापुर्वी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. फक्त 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. वर्गातील एकुण विद्यार्थी संख्येपैकी दोन गट करण्यात येणार आहेत. आज एक गट शाळेत आला की दुसर्‍या दिवशी दुसरा गट शाळेत येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com