नवापूर | श.प्र.- NANDURBAR

नवापूर तालुक्यातील चार पोल्ट्री फार्मचे बर्डफ्लूचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून या चारही फार्ममधील ४ लाख पक्षांचे ‘कलिंग’ अर्थात नष्ट करण्याचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. पंधरा वर्षांनी नंदुरबार जिल्ह्यात बर्डप्लूचा शिरकाव झाला असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा नवापूरात दाखल झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये ४० हजारावर कुक्कुटपक्षांचा मृत्यू झाला आहे. शहरातील चार पोल्ट्री फार्ममधील मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी भोपाळमध्ये पाठवण्यात आले होते.

त्यांचा अहवाल प्राप्त होवून त्यांचा बर्डफ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्या चार पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबडयांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता, तेथील जवळपास चार लाख कोबड्यांचे कलिंग अर्थात पक्षी नष्ट करण्याचे काम सुरु झाले आहे.

या मृत पक्षांना शास्रोक्त पद्धतीने खड्डे करून विविध प्रकारच्या औषधींचा उपयोग करत प्रशासनाच्या वतीने दफन करण्याची सुरुवात झाली आहे.

या फार्मच्या परिसरातील १२ अन्य पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोंबड्यादेखील धोकादायक क्षेत्रात आल्या आहेत. एकट्या नवापूर तालुक्यात २२ पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास साडे नऊ लाख कुकुटपक्षी आहेत.

या निर्णयाने कुकुटपालन व्यायसायीकांचे मात्र कोट्यवधी चे नुकसान होणार असुन २००६ च्या बर्डफ्लूनंतर जेमतेम उभारी घेत असलेल्या या व्यावसायिकांचे पुन्हा कंबरडे मोडले जाणार आहे.

प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नवापुर तालुक्यातील अंडी, कोंबडी मांस विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. तर नवापुर तालुक्यात कोबड्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसात पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले आहेत.

उर्वरित १८ ते २० पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे अहवाल आज घेण्यात येणार असून तपासणीसाठी भोपाळ येथे पाठवून रिपोर्ट पॉझिटिव आल्यास किलिंग ऑपरेशनला सुरुवात करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली.

प्रशासनाकडून एका पक्षी मागे ९० रुपये मोबदला देणार असल्याची माहिती पोल्ट्री असोसिएशन अध्यक्ष आरिफ बलेसरिया यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या मोबदल्यावर नाराजी व्यक्त करत आम्हाला एक पक्षी मोठा करण्या साठी जवळ जवळ ४०० रुपये खर्च येत असल्याने सदर मोबदला मिळणार असला तरी आमच्या व्यायसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.