मोटरसायकलच्या धडकेत जखमी झालेली बालिका तीन दिवसांपासून बेपत्ताच

तळोदा-बोरद रस्त्यावरील घटना
मोटरसायकलच्या धडकेत जखमी झालेली बालिका तीन दिवसांपासून बेपत्ताच

बोरद | वार्ताहर TALODA

भरधाव मोटारसायकलस्वाराने ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय बालिकेला धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली आहे. मात्र, घटनेनंतर सदर जखमी बालिकेला दवाखान्यात न नेता मोटरसायकलस्वार तिला घेऊन फरार आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तळोदा-बोरद रस्त्यावरील कढेल फाट्याजवळ घडलेल्या या घटनेला तीन दिवस लोटले तरी अद्याप बालिका बेपत्ताच असल्याने तिच्या कुटूंबियांचा जीव टांगणीला लागला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील काकडद्याच्या घाटली-आगरीपाडा येथील मोत्या काल्या पटले हे ऊसतोड मजूर नोव्हेंबर महिन्यापासून तळोदा-बोरद रस्त्यालगत कढेल फाट्याजवळील शेतात वास्तव्यास आहेत.

त्यांच्यासह १४-१५ कुटुंबीय असून ते ऊसतोडणीचे काम करतात. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हे ऊसतोड मजूर नेहमीप्रमाणे ऊस तोडून गाडी काम करत होते. त्याचवेळी मुन्नी मोत्या पटले ही दहा वर्षीय बालिका रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात लहान चुलत भावासोबत पाणी भरण्यासाठी गेली होती.

पाणी भरून ती रस्ता ओलांडत असतांना मोडकडून तळोदाकडे भरधाव वेगात जाणार्‍या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वारांनी तीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुन्नी ही काटेरी झुडपांमध्ये फेकली गेल्याने तिला जबर दुखापत झाली व तिच्या नाका तोंडातून रक्त येण्यास सुरुवात झाली.

यानंतर भयभीत झालेले दुचाकीस्वार मुन्नीला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून मोटारसायकलवर बसवून परत मोड गावाच्या दिशेने घेऊन गेले.

हा सर्व प्रकार तिच्यासोबत असणार्‍या लहान भावाने ऊसाची गाडी भरणार्‍या मुन्नीच्या आईवडीलांना व सहकार्‍यांना सांगितली. त्यानंतर त्या सर्वांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी त्यांना रक्त सांडलेले आढळून आले व धडक देणार्‍या दुचाकींस्वार मुलीला मोडकडे घेऊन गेल्याची माहिती दिली.

त्यानंतर त्या सर्वांनी मोड येथील दवाखान्यात मुन्नीचा शोध घेतला, पण त्यांना कुठेही मुन्नी आढळून आली नाही.

त्यांनी परिसरातील बोरद, तर्‍हावद, वैजाली, प्रकाशा आदीसह परिसरातील गावातील दवाखान्यात मुन्नीचा मंगळवारी रात्री उशीरापर्यत शोध घेतला असता त्यांना अशा प्रकारची अपघात झालेल्या बालिकेला उपचारासाठी आणण्यात आले नसल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे ते दुचाकीस्वार अपघातात जखमी झालेल्या मुन्नीला नेमके कुठे घेऊन गेलेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू न शकल्याने पटेल कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत.

दरम्यान, या घटनेचा निरोप पटले कुटुंबियांनी आपल्या मूळ गावी काकडदा येथे दिल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व बुधवारी सकाळपासून मुन्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मात्र, सायंकाळपर्यत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मुन्नीच्या वडीलांनी बुधवारी दुपारी तळोदा पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलीसांनीदेखील शोध कार्याला सुरुवात केली असल्याचे समजते.

पोलिसांनी जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, याठिकाणी भेटी देऊन याबाबत विचारपूस केली. मात्र मुन्नी आढळून आली नाही. आज तीन दिवस झाले तरीही ही बालिका बेपत्ताच आहे.

अपघातग्रस्त मुन्नी नेमकी कुठे आहे व कशी आहे याबाबत पटले कुटुंबीय अनभिज्ञ असून मुन्नीची आई रडून बेजार झाली आहे. संपूर्ण काकडदा ग्रामस्थ चिंतातूर झाले असून मुन्नीचा ते शोध घेत आहेत.

अपघातात जखमी झालेली मुन्नी बेपत्ता होऊन तीन दिवसांंपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरीही ती सापडली नसल्याने तिचे कुटूंबिय चिंतीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com