तळोदा-शहादा तालुक्यांत बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट

आ. पाडवी यांच्या तक्रारीनंतर मालदा येथे आरोग्य पथक दाखल, मात्र बोगस डॉक्टराने ठोकली धूम
तळोदा-शहादा तालुक्यांत बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट

बोरद - Borad - वार्ताहर :

तळोदा व शहादा तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कुठलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आदिवासींच्या जीवाशी खेळत असल्याबाबत आ.राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते.

त्या अनुषंगाने आरोग्य पथक मालदा येथे दाखल झाले. मात्र शासकीय पथक पोहचण्यापूर्वीच येथील बोगस डॉक्टराने धूम ठोकली आहे.

मालदा गावात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून एका कुडाच्या झोपड्यात बंगाली डॉक्टर हा दवाखाना थाटून औषधोपचार करत होता.

घरपोच डॉक्टर येत असल्याने या स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देत असल्याने डॉक्टरांचे चांगलेच फावले होते.

सदर बाब काहींना समजली त्यामुळे मालदा येथील सरपंच करुणा पवार यांचे पती गोपी पवार यांनी आ.राजेश पाडवी यांना याबाबत तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून अश्या बोगस डॉक्टरांची चौकशीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने कारवाईचे आदेश जिल्ह्यधिकार्‍यांकडून प्राप्त होताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने बोरद येथील येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा शिंदे, सहायक गटविकास अधिकारी एस.डी. सोनवणे, डॉ.पंकज पावरा, आरोग्य कर्मचारी डी.बी.अहिरे बोरद येथील पोलीस कर्मचारी एकनाथ ठाकरे आदींचे पथक मालदा गावात दाखल झाले. मात्र, पथक येणार असल्याचा सुगावा लागताच संबंधित डॉक्टर हा दवाखाना बंद करून कुटुंबियांना घेऊन फरार झाला होता.

या पथकाने संबंधित डॉक्टराबाबत गावातील नागरिकांकडून विचारपूस करून तो कशाप्रकारे औषधोपचार करायच्या अशी माहिती जाणून घेऊन त्याच्याबद्दल चौकशी केली.

तो ज्या ठिकाणी औषधोपचार करत होता. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या कुडाच्या घराबाहेर कोरोना रुग्णासाठी वेळापत्रक जाहीर करून रुग्णांना तपासण्याची वेळ निश्चितीचे फलक त्यांना दिसून आले.

दरम्यान, त्या झोपडीत स्टेथोस्कोप, टेबलावर औषधी आदी पथकास दिसून आले. दरम्यान त्यांनी सदर झोपडीला कुलूप लावून सील केले.

संबंधित डॉक्टर याठिकाणी कधीही परत आल्यास तसे पथकास कळविणेबाबत आवाहन केले. पथकासोबत आलेले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी मालदा येथील ग्रामस्थांना अश्या बोगस डॉक्टरपासून उपचार घेतल्यानंतर जीव जाण्याची शक्यता असते.

अश्या डॉक्टरपासून सावध राहा व त्यांना पुन्हा गावात येऊ देऊ नका असे म्हणून बोलीभाषेत जनजागृती केली. संबंधित डॉक्टर पुन्हा आढळल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com