चिनोदा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

बिबट्याचा वराहावर हल्ला
चिनोदा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर TALODA

चिनोदा येथील शेतशिवारात मागील तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी दीपक जगन्नाथ पटेल व त्यांचे टँक्टर चालक माधव पवार हे चार दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास टरबूज लागवड क्षेत्र सांभाळ्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या संचार करतांना दिसून आला.

तसेच दि.६ मे रोजी सकाळच्या सुमारास टँक्टर चालक माधव पवार शेतात गेले असता बिबट्याने केळी शेताच्या बांधावर एका वराहावर हल्ला केला. याच शिवारात मानसिंग सुपडू वळवी यांच्या तूर लागवड केलेल्या शेतातसुध्दा बिबट्याचे ठसे दिसून आले.

त्यामुळे शेतकरी दीपक जगन्नाथ पटेल यांनी सदर माहिती तात्काळ वनविभागाला दूरध्वनीवरुन देऊन चिनोदा शेतशिवरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याची माहिती देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

सध्या शेतशिवारात खरीप हंगामाची पूर्व मशागतीचे कामे तसेच रात्री-अपरात्री शेतकर्‍यांकडून केळी, ऊस या पिकांना पाणी देणे अशी शेतीची कामे शेतकर्‍यांकडून करण्यात येत असून त्यातच चिनोदा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाणे व पिकांना पाणी देणेही जिकीरीचे झाले आहे.

दरम्यान, चिनोदा परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी चिनोदा शिवारातील सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील शेतामध्ये राखण करणार्‍या कुटुंबाच्या समोर अचानक दोन मोठे व एक लहान बिबट्याचे दर्शन झाले होते.

त्यात ते राखण करणार्‍या कुटुंबाने तत्परता दाखवत बाजूलाच असलेल्या झाडावर चढून आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले होते. तर दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी वन विभागाने चिनोदा शेतशिवरात बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावण्यात आला होता.

मात्र बिबट्याने कॅमेरा व पिंजर्‍याला सुध्दा हुलकावणी दिली. त्यामुळे चिनोदा परिसरात बिबट्याची दहशत कायम असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी चिनोदा परिसरातील शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com