उपसरपंचांच्या निधनानंतर सरपंचांनीही घेतला जगाचा निरोप

प्रतापपूर गावातील दुर्दैवी घटना
उपसरपंचांच्या निधनानंतर सरपंचांनीही घेतला जगाचा निरोप

बोरद - Borad - वार्ताहर :

प्रतापपूर ता.तळोदा येथील उपसरपंचांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसात सरपंचांनीही जगाचा निरोप घेतल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण नवल शिंदे (वय 55, कोळी) यांची गत आठवड्यात प्रकृती खालावल्याने धुळे येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दि.5 रोजी त्यांचे निधन झाले होते.

त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी प्रतापपूर ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच राणाप्रताप हायस्कूलचे कर्मचारी रोहिदास पावरा (वय 45) यांनाही प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने काल दि.7 रोजी उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

परंतु उपचारादरम्यान अल्पशा आजाराने त्यांचे गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास निधन झाले. उपसरपंच यांच्या निधनानंतर केवळ तीन दिवसाच्या अंतराने सरपंचांचे निधन झाल्याने संपूर्ण प्रतापपूरवासीयांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

रोहिदास पावरा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. ते प्रतापपूर येथील किरण पावरा व प्रदिप पावरा यांचे वडील होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com