जलोला येथे होणारा बालविवाह रोखला

चाईल्ड लाईन व पोलीसांची कारवाई
जलोला येथे होणारा बालविवाह रोखला

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

जलोला ता.धडगाव येथे चाईल्ड लाईन १०९८ तसेच धडगाव व नंदुरबार पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह रोखण्यात आला. जलोला ता.धडगाव येथे आज दि.२ जानेवारी रोजी १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. यातील नियोजीत वर हा बालिक होता. परंतू मुलीचे वय १५ वर्ष होते. सदर विवाहाबाबत परिसरात चर्चा सुरु झाली.

जलोला येथे बालविवाह होणार असल्याची सर्वप्रथम खात्री करण्यात आली. त्यामध्ये बालविवाह संदर्भात लग्नाची पत्रिका, मुलीच्या जन्माचा दाखला आणि ठिकाण या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली.

दावलशा महिला उन्नती मंडळ संचलित चाईल्ड लाईन १०९८ च्या सदस्यांनी तसेच नंदुरबार व धडगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने जलोला येथे जावून दोन्ही पक्षांचे समुपदेशन केले. आणि संबंधित बालविवाह हा थांबवण्यात आला दोन्ही पक्षांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ विषयी कल्पना देण्यात आली.

विवाह संपन्न होण्याची प्रक्रिया सुरु असतांनाच हे पथक तेथे पोहचले आणि होणारा बालविवाह रोखला. याप्रसंगी चाइल्ड लाइन आणि दावलशा महिला उन्नती मंडळ तळोदा अध्यक्षा, नंदुरबार डायरेक्टर वंदना तोरवणे तसेच समुपदेशक मेघा पाटील, समन्वयक आशिष शेवाळे, टीम मेंबर संदीप भामरे, सुरेश पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते.

बालकल्याण समिती अध्यक्ष विठ्ठलराव कदम तसेच महिला व बालविकास विभाग श्री.जाधव, श्री.लांडगे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे ही मोहीम आज यशस्वीपणे राबविण्यात आली. म्हणून सर्व टीमचे कौतुक करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com