नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

स्प्राऊटींग सीड आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात बेस्ट लघू चित्रपटाचा मान रशियातील मेन डोन्ट क्राय या चित्रपटाने पटकावला.

तसेच इटली येथील पोस्ची-कव्हर कार्बन ला बेस्ट लघूपटाने गौरविण्यात आले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू,असे आश्वासन खा.डॉ हीना गावित यांनी दिले.

नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात रविवारी स्प्राऊंटींग सीड इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवल 2020 चे आयोजन करण्यात आले होते.

खानदेशात प्रथमच होणार्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात जगभरातील 35 देशातून 471 लघू चित्रपट सहभागी झाले होते.

या महोत्सवाचे बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्यासह मध्यप्रदेश येथील दिग्दर्शक डॉ.आलोक सोनी, मुंबई येथील दिग्दर्शक श्याम रंजनकर, सुभाष तायडे पाटील, शुभम अपूर्वा, रोशनी फिल्म फेस्टीवलचे संस्थापक अध्यक्ष तुषार थोरात आदीच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. फिल्म फेस्टीवल कमिटी बोर्डचे डायरेक्टर डॉ.सुजित पाटील, शुभम, डॉ. प्रकाश ठाकरे, डॉ.सी.डी.महाजन, डॉ.राजेश कोळी, डॉ.राजेश वळवी, रणजित राजपूत, डॉ.खुशालसिंग राजपूत आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बेस्ट लघुचित्रपट म्हणून रशियातील मेन डोन्ट क्राय, बेस्ट फिचर फिल्म म्हणून बर्किनी फासो येथील ब्रीथलेस, बेस्ट माहितीपट म्हणून इटली येथील पोस्ची- कव्हर कॉर्बन, बेस्ट अॅनिमेशन फिल्म म्हणून ब्रेक द स्टीरियोटाइप, बेस्ट म्युझिक व्हीडीओ म्हणून लाही लाही, बेस्ट कोविड 19 फिल्म म्हणून को-वार, बेस्ट मोबाईल फिल्म म्हणून टाईम आदींच्या दिग्दर्शकांना प्रथम पारितोषिक देण्यात आलेत. याच प्रकारात द्वितीय व तृतीय असे एकुण 90 पुरस्कारही देण्यात आलेत. चित्रपट महोत्सवात संवाद नसलेला इनरफ हा लघू चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुुख करून गेला.

या चित्रपट महोत्सवासाठी हॉलीवूड अमेरिका, जर्मनी, इराण, कोरीया, बांग्लादेश आणि भारतातील बॉलिवूड मधील दिग्गज आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच 35 देशातून 471 चित्रपटांचा सहभाग हा देखील या चित्रपट महोत्सवाने विक्रम केला.

यावेळी खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या, चित्रपट महोत्सव म्हटला की पुणे मुंबई हीच शहरे डोळयासमोर येतात.परंतू नंदुरबार शहरात हा महोत्सव भरवून या शहराला आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचविण्याचे कार्य या नंदुरबारच्या आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवाने केले आहे.

ग्रामीण भागात सोंगाडया पार्टी अभिनयाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. चित्रपटाच्या या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील कलावंतांना निश्चितच प्रेरणा मिळेल.

राजेंद्रकुमार गावित म्हणाले, राजकारणात माणसे दुरावतात तर कलेच्या माध्यमातून राजकीय व्यक्ती एकत्र येतात. एवढी ताकद कलेत आहे. नंदुरबार जिल्हयात प्रथमच हा लघूचित्रपट महोत्सव घडवून आणला गेला. एक रसिक म्हणून या महोत्सवाला सर्वोतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न होता. कार्यक्रम यशस्वी झाल्याचा आनंद आहे. यापुढे याहून अधिक भव्यप्रमाणात कार्यक्रम घडवून आणू,असा संकल्प त्यांनी केला.

आलोक सोनी म्हणाले, अतिशय सुंदर अशा पध्दतीने नियोजन करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवाने निश्चिंतच उंची गाठली आहे. प्रत्येक कलांवतांची सोय करण्यात आली. पुर्वी चित्रपट विशिष्ट शहरांची मक्तेदारी होती. ती मक्तेदारी मोडीत काढण्यात यश मिळाले आहे. आता सुविधा झाल्या आहेत. ग्रामीण भागातून सैराट चित्रपट तयार होतो.तो जगभरात नावलौकिक होता. चित्रपटांत स्थानिक भाषा,वातावरण यांची सांगड घातलेली असते. प्रेक्षकांना वास्तवतेकडे जाणारे चित्रपट आवडतात. मनोरंजनासोबतच आशय असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात. नंदुरबारच्या च़ित्रपट महोत्सवात अनेक सुंदर चित्रपट पाहायला मिळाले. परीक्षक म्हणून हे काम कठीण होते.तेही पार पडले.

मानसिंग राजपूत यांनी स्क्रीनची सुविधा केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुजित पाटील यांनी केले. सुत्रसंचलन जयती शाह यांनी केले. आभार डॉ.प्रकाश ठाकरे यांनी मानले.

विदेशातील ज्यूरी यांग मान कांग अमेरिका,थॉमस गॉर्श जर्मनी,अली घियाश्वांद इराण,मोंजरूल इस्लाम मेघ बांग्लादेश,तसेच भारातातील युसुफ काझमी यांनी ऑनलाईन परीक्षण करून निकाल पाठवला.