नंदुरबार पालिकेतर्फे सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

नंदुरबार पालिकेतर्फे सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

सौर उर्जा प्रकल्प राबविणारी राज्यातील पहिली नगरपालिका

नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

येथील पालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. सौर उर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविणारी नंदुरबारची नगरपालिका महाराष्ट्रातील पहिली ठरली आहे.

९३९ किलो वॅट चा हा प्रकल्प सुरु झाल्यापासुन उर्जा बचतीसह आर्थिक बचतही झाली आहे. ही संकल्पना माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी मांडली होती.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हा प्रकल्प एकुण १० साईटस्वर लावण्यात आला आहे.

झराळी वॉटर पंपींग स्टेशन, झराळी वॉटर फिल्टर प्लांट, एस.टी.पी.प्लांट नळवा आणि इतर ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहे. सध्या प्रकल्पामधून तयार होणार्‍या विजेतून महिन्याला ६ ते ७ लाख रुपयांची बचत होत आहे.

उर्वरित ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर परवानगी दिल्यास सदर बचतीमुळे येणार्‍या ५ ते ६ वर्षात प्रकल्प किंमत संपूर्णपणे वसूल होणार आहे.

या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोनो क्रिस्टलाईन सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आलेले आहेत. मोनो क्रिस्टलाईन सौर ऊर्जा पॅनल देशात पहिल्यांदाच सरकारी प्रकल्पामध्ये वापरण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे एबीबी आणि फ्रॉनीयस ह्या युरोपियन कंपन्यांचे इन्व्हर्टर वापरलेले आहेत. तसेच डीसी केबलिंग करताना फ्रॉगलिप आणि ऑप्टीमाईज्ड स्ट्रिंगिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या प्रकल्पात वापरण्यात आलेल्या स्ट्रक्चरचे स्टॅड विश्लेषण करण्यात आलेले आहे.

अशाप्रकारे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाईन याची सांगड या प्रकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार नगर परिषदेने घातली आहे. त्याचा परिणाम आतापर्यन्त झालेल्या चांगल्या वीज उत्पादनातून दिसून येत आहे.

सदर प्रकल्पातून नियमित विज उत्पादन व्हावे यासाठी देखभाल दुरुस्ती सुध्दा नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे. हा प्रकल्प अभूतपूर्व डिझाईन मुळे तंत्रशिक्षणातील तरुण विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, नागरिक यांना मार्गदर्शक ठरणार आहे.

लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक सेवांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. नंदुरबार नगरपालिकेची पुढील २५ वर्षे वीजबचत तर होणारच आहे मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सर्व नंदुरबारवासीयांना अभिमानस्पद वाटावा अश्या प्रकल्पामुळे शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com