नंदुरबार - Nandurbar

नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावात कापूस व्यापाऱ्याने कापसाची खरेदी करताना मापात पाप करीत क्विंटलमागे सुमारे 7 ते 8 किलो लूट केल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनात आल्याने येथील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला चांगलाच चोप देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या परिसरात कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कापूस गावात आलेल्या व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून भोळ्या मनाने विक्री केली परंतु गुजरातच्या कुकूरमुंडा येथील एका व्यापाऱ्याने त्याच्या वजन काट्यात अफरा-तफर करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, कित्येक दिवसापासून हा व्यापारी परिसरातील वावद,रजाळे, शनिमांडळ, बलवंड, सैताणे या गावांमध्ये कापसाची खरेदी करीत आहे.

आज पावेतो लाखोंची लूट केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. या व्यापार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.कापसाला क्विंटल मागे 5 हजार २५० रुपये इतक्या दराने खासगी व्यापारी खरेदी करीत आहेत. नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील वावद, ढंढाणे, रजाळे शनिमांडळ, बलवंड, सैताणे, खर्द खुर्द, तलवाडे आदी गावांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परिसरात खाजगी व्यापारी गावातच कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनीही या व्यापार्यावर विश्वास टाकत आपला माल गावातच विक्री करीत असतात परंतु हे व्यापारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याने मापात पाप करीत आहेत. ही बाब सैताणे येथील एका शेतकऱ्याच्या लक्षात आले असता त्यांनी वजनाची चौकशी केली त्याच्या वजनात तफावत असल्याचे आढळून आले.

सदरची बाब व्यापाऱ्यांना सांगितले असता व्यापाऱ्याने ही बाब नाकारल्याने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला बेदम चोप देत संताप व्यक्त केला. क्विंटलमागे सात ते आठ किलो इतक्या कापसाची चोरी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला दंड आकारण्याचे ठरविण्यात आले.