रेमडीसिवीर इंजेक्शनचा जिल्हयात तुटवडा

रुग्णांचे नातेवाईक होताहेत हतबल
रेमडीसिवीर इंजेक्शनचा जिल्हयात तुटवडा

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात करोनावर उपचाराचा भाग म्हणून आवश्यक असलेल्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हतबल होतांना दिसत आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासनासह अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष घालून सदर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हयात गेल्या महिन्याभरापासून करोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. 1 मार्चपुर्वी जिल्हयात करोना रुग्णांची संख्या 300 पेक्षा कमी होती.

मात्र, या महिनाभरात दररोज पाचशे, सातशे, आठशे असे रुग्ण आढळत असल्याने आज रुग्णांची संख्या आठ हजारावर पोहचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांना रेमडिसीविर हे इंजेक्शन अत्यंत आवश्यक आहे.

तेदेखील एकेका रुग्णाला किमान 6 इंजेक्शन द्यावे लागत आहे. मात्र, जिल्हयात या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. मात्र, त्या तुलनेत हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही.

त्यामुळे रुग्णांचे नातलग हतबल झाले आहे. हे इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागता आहे. अनेक जण शेजारील गुजरात राज्यात उपचारासाठी जात आहेत. यात त्यांचा वेळ, पैसा वाया जात असून रुग्णांची हेळसांडही होत आहे.

नंदुरबार येथील माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी रोटरी क्लबमार्फत 1200 रुपयांत, उद्योगपती डॉ.रविंद्र चौधरी यांनी सिद्धार्थ मेडीकलमार्फत 899 रुपयांत, शहादा येथील दीपक पाटील यांनी 775 रुपयांत तर आ.राजेश पाडवी यांनीदेखील 775 रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहे.

मात्र, हे इंजेक्शन सवलतीच्या दरात मिळत असल्याने तसेच रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे इंजेक्शन उपलब्ध झाल्यानंतर तासाभरातच संपत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण या इंजेक्शनपासून वंचित राहत आहेत.

त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासह अन्न व औषधी प्रशासनाने याबाबत दखल घेवून संबंधीत स्टॉकीस्ट, डिस्ट्रीब्युटर यांची बैठक घेवून त्यांच्याकडे हे इंजेंक्शन का उपलब्ध होत नाही, याबाबत माहिती घेवून त्यांना हे इंजेक्शन मोठया प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावा, संबंधीत कंपन्यांकडेही पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com