शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन तिघा भावांनी केला भावाचा खून

वडील जखमी
शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन तिघा भावांनी केला भावाचा खून
Crime

म्हसावद | वार्ताहर - SHAHADA

रामपूर प्लॉट, ता.शहादा येथे शेतीच्या हिस्सेवाटणीवरून भावाभावात वाद होवून एका भावावर कुर्‍हाडीने व सळईने वार करुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूर येथील हिम्मत संभाजी पावरा (२८) यांचे वडील संभाजी वालजी पावरा हे युवराज पावरा, सुरेश पावरा, दोहन्या पावरा यांच्या घरी शेतीच्या हिस्से वाटणीसाठी आले असता,

तेथे हजर त्यांच्याशी तिघा मुलांनी वाद घालून मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी हिंमत संभाजी पावरा व त्याचा भाऊ वनसिंग पावरा हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, युवराज पावरा याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने भाऊ वनसिंग पावरा याच्या डोक्यावर मध्यभागी वार करून गंभीर दुखापत केली.

सुरेश पावरा याने त्याच्या हातातील लोखंडी सळई वनसिंग याच्या पोटात खोपसली. दोहन्या पावरा याने त्याच्या हातातील लाकडी डेंगार्‍याने वनसिंग याच्या छातीवर, पाठीवर व उजव्या हाताच्या दंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली.

संभाजी पावरा यांनासुध्दा सुरेश पावरा याने सळईने उजव्या कानाच्या मागे, पोटावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. हिंमत पावरा यांना लाकडी डेंगार्‍याने मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीमुळे वनसिंग पावरा यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंमत पावरा व संभाजी पावरा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत हिंमत पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन युवराज पावरा, सुरेश पावरा, दोहन्या पावरा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिर्‍हाडे पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com