शिरुड अफु शेती प्रकरण : गुन्ह्यातील मास्टरमाईंडला गुजरातमधून अटक

न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी
शिरुड अफु शेती प्रकरण : गुन्ह्यातील मास्टरमाईंडला गुजरातमधून अटक

शहादा - Shahada - ता.प्र :

तालुक्यातील शिरुड त.ह. गावाच्या शिवारातील अफु शेतीप्रकरणी मास्टरमाईंडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात राज्यात सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कांकवटी येथून अटक केली आहे.

न्यायालयाने संशयीत आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरुड गावाच्या शिवारात साडेसात एकर शेतामध्ये अफु या अंमली पदार्थाचे लागवडीबाबत मिळालेल्या गुप्त बातमीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा व म्हसावद पोलीस ठाण्याचे पथकाने छापा टाकुन शेतात लागवड केलेला 9 हजार 450 किलो वजनाचा 45 लाख 27 हजार किमंतीचा अफु सलग 3 दिवस कारवाई करुन जप्त केला होता.

याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन 5 आरोपींना अटक केली होती. गुन्ह्याची व्याप्ती व गांभिर्य लक्षात घेऊन गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार शोधुन कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी अटक असलेल्या पाचही आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराची माहीती काढली.

मुख्य आरोपी हा गुजरात राज्यात सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कांकवटी या गावात नाव बदलुन राहत खात्रीशिर माहिती मिळविली.

मिळालेल्या माहितीनुसार सपोनि संदिप पाटील, पोहवा मुकेश तावडे, पोकॉ विजय ढिवरे यांचे पथक तयार करुन आरोपी राहत असलेल्या भागात रवाना केले.

पथकाने सतत 3 दिवस सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कांकवटी येथे तळ ठोकुन वेषांतर करुन आरोपीच्या बदललेल्या नावाबाबत माहिती मिळवुन शिताफीने अटक केली.

अटक आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार येथे आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानेच अटक असलेल्या आरोपींना शेतात लागवड करण्यासाठी अफुचे बियाणे उपलब्ध करुन दिल्याचे मान्य केले आहे.

अटक आरोपीस न्यायालयात हजर केले असून आरोपीस 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थागुशाखेचे सपोनि संदिप पाटील पुढील तपास करीत आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com