म्हसावद, ता.शहादा - Shahada - वार्ताहर :

घरासमोर थुंकल्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना इस्लामपूर ता.शहादा येथे घडली.

याबाबत म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामपूर ता.शहादा येथे बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अंबालाल ऊर्फ शिवराम सुभाष वळवी(27) हा गावातील जगन पावरा याच्या दुकानात गेला.

त्यावेळी अंबालालने थुंकल्यावरून सागर रायसिंग ठाकरे याने तू मला पाहून का थुंकला, या कारणावरून दोघात भांडण झाले.

यावेळी सागर याने लाकडी दांडक्याने अंबालाल याच्या डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तसेच रायसिंग तारसिंग ठाकरे, गोरख भालसिंग ठाकरे, भालसिंग रामसिंग ठाकरे, पिंट्या लालू ठाकरे, लालू रामसिंग ठाकरे (सर्व रा.इस्लामपूर) यांनी हाताबुक्याने मारून, जीवे मारण्याची व घर जाळून टाकण्याची धमकी दिली.

तसेच फिर्यादी व साक्षीदारांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर मारहाणीत जखमी अंबालाल उर्फ शिवराम यास म्हसावद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता औषधोपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

डॉ.गोविंद शेल्टे, डॉ.सागर वसावे यांनी शवविच्छेदन केले. मयताची पत्नी सोनुबाई शिवराम वळवी यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीसात भादंवि कलम 302, 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घूमरे यांनी भेंट देऊन चौकशी केली. पुढील तपास सपोनि किरण पवार करीत आहेत.