आमलाड | वार्ताहर - nandurbar

माळखुर्द ता.तळोदा येथे बहिणीच्या उपचारासाठी खर्च न करणार्या मेव्हण्याच्या शालकाने कुर्हाडीने खून केल्याची घटना शनिवार दि.२० मार्च रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी शालकास अटक केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माळखुर्द ता.तळोदा येथे राहणार्या गणपत दिवाल्या वसावे याचा माळखुर्द येथेच राहणार्या परंतु हल्ली मुक्काम कल्याण, जिल्हा ठाणे येथे असणार्या किसन गवल्या वळवी यांच्या बहिणीशी विवाह झाला होता.

मात्र गणपत वसावे नेहमी किसन वळवी यास सांगत असे की तुझ्या बहिणीच्या उपचारावर खर्च करण्यापेक्षा तेवढ्या पैशावर मी दुसरी बायको करेल. त्यामुळे किसन वळवी याने राग मनात ठेवून शनिवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास रागाच्या भरात मेव्हणा असलेल्या गणपत वसावे याचा शरीरावर ठीक ठिकाणी कुर्हाडीने वार करत गंभीर दुखापत करून जागीच ठार मारले.

त्यामुळे माळ खुर्द गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे ,पोलीस हवालदार महेंद्र जाधव ,पोलिस नाईक युवराज चव्हाण, विनोद नाईक ,वाहन चालक रघुवीर रामोळे यांनी रात्रीच सातपुड्याच्या दुर्गम भागातील माळ खुर्द गाठले व घटनेची माहिती घेऊन किसन गवल्या वळवी रा.माळ खुर्द यास ताब्यात घेऊन अटक केली.

मयताचे वडील दिवल्या मोत्या वसावे यांच्या फिर्यादीवरून किसन वळवी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहेत.