खोडसाळपणा : थेट पशुसंवर्धन आयुक्तांना फोन आणि...

200 वराहांचा मृत्यू झाल्याची अफवा
खोडसाळपणा : थेट पशुसंवर्धन आयुक्तांना फोन आणि...

बोरद - Borad - वार्ताहर :

येथे एकाच दिवशी तब्बल 200 वराह मेल्याचा खोडसाळ फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना केल्यानंतर बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीच या विभागाची स्थानिक यंत्रणा खडबडून जागी होवून गाव गाठले.

बोरद गावात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वराह मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी कळविले होते. त्यानुसार स्थानिक वैद्यकीय पथकास तत्काळ घटनास्थळी पाठविले होते. तथापि, गेल्या आठवड्यात वराह मेल्याची घटना घडली होती. तेही दोनच वराह मेले होते. तरीही खबरदारीबाबत गावाकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

डॉ.यु.डी.पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी.जिल्हा परिषद नंदुरबार.

तेथे पहिल्यानंतर असा कोणताच प्रकार घडलेला निदर्शनास आला नाही. परंतु पथकाला पाहून गावकरी देखील अवाक झाले होते.

गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, पथकाने गावकर्‍यांना मार्गदर्शन केलेे. मात्र, अफवेमुळे कर्मचारी हैराण झालेे. असा खोडसाळपणा करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तळोदा तालुक्यातील बोरद येथे शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 200 वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याचा दुरध्वनी थेट पशू संवर्धन विभागाच्या आयुक्तांना करण्यात आला. साहजिकच बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आरोग्य यंत्रणेने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला व या विभागाने स्थानिक पशू संवर्धन विभागाला माहिती दिली.

फोनाफोनी झाल्यानंतर ही यंत्रणा चांगलीच खडबडू जागी झाली होती. या विभागाचे वैद्यकीय पथक रात्रीच बोरद गावात दाखल झाले. हा प्रकार ज्या ठिकाणी घडल्याचे सांगण्यात आले होते, तेथील परिसराची पाहणी केली.

येथे पहिल्यावर असा कुठलाच प्रकार पथकाला आढळून आला नाही. पथकाने संपूर्ण गावात पाहणी केली. प्रत्यक्ष गावकर्‍यांना विचारले असता गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे सांगण्यात आले.

तथापि, असा खोडसाळपणा आरोग्य कर्मचारी खूपच हैराण झाले होते. केवळ दोन वराह मृत्यूमुखी पडल्याचे या विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी पुन्हा पथकाने गावातील नागरिकांची बैठक घेवून गावकर्‍यांना मार्गदर्शन केले. शिवाय बर्ड फ्ल्यूबाबत खबरदारी घेवून जागृती करण्याचे आवाहन केले. अशा अफवा कोणी पसरवू नये. आधीच बर्ड फ्लूविषयी लोकांमध्ये कमालीची भिती आहे. यापुढे अशा अफवा कोणी पसरविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

सदर पथकामध्ये पशुधन विकास अधिकारी डॉ.गोस्वामी, पशुधन विकास अधिकारी डॉ. नवले, पशुधन विकास अधिकारी डॉ. महेंद्र जमदाडे, ड्रेसर श्री. बहिराम यांच्या पथकाने खबरदारी म्हणून पशुपालकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य विजयसिंग राणा, माजी जि.प.सदस्य नरहर ठाकरे यांच्यासमक्ष सदरील पथकाने गावातील कानाकोपर्‍याची पाहणी केली असता एकही वराह मरण पावल्याचे आढळून आलेले नाही. तरी सदर पथकाने वराह मालकास विचारपूस केली असता मकरसंक्रांतीच्या काळात वराह चार पाच दिवसात एक तरी मरण पावतो असे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com