व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात प्रशिक्षणाचा बोजवारा

महाराष्ट्रातील तब्बल 240 प्राचार्यांची पदे रिक्त

राकेश कलाल - Nandurbar - नंदुरबार :

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातांतर्गत येणार्‍या आयटीआय व तांत्रिक विद्यालयांमध्ये राज्यात प्राचार्यांची तब्बल 240 पदे रिक्त आहे.

एकेका प्राचार्यावर दोन तीन अतिरिक्त पदभार आहेत. जळगाव जिल्हयातील एका प्राचार्याकडे तब्बल 8 संस्थांचा अतिरिक्त कार्यभार आहे. निदेशकांचीही अशीच स्थिती आहे.

त्यामुळे या संस्थांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, संबंधीत विभागात आपल्याच कार्यशून्य कारभारात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणार्‍या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अखत्यारित 417 शासकीय आयटीआय व 53 तांत्रिक विद्यालय कार्यरत आहेत. औद्योगिक आस्थापनांना कुशल व अर्धकुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी व पुरवण्याची या विभागाची जबाबदारी आहे.

परंतू संचालनालयाचा ढिम्म व अनागोंदी कारभार सुरू आहे. संचालनालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार महाराष्ट्रात तब्बल प्राचार्य (गट ब) यांची 240 पदे रिक्त आहेत. म्हणजे 240 संस्थांमध्ये प्रशिक्षण वार्‍यावर असल्याचे निदर्शनात येते.

या संस्थेत प्रशिक्षण घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. संचालनालयाला याविषयी कोणतेही सोयरसुतक नसून ते आपल्या कार्यशून्य कारभारात मग्न आहेत.

सर्व विभागात प्रत्येक प्राचार्याकडे दोन तीन संस्थांचा अतिरिक्त कारभार सोपवला गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील एका प्राचार्याकडे तब्बल 8 संस्थांचा अतिरिक्त कार्यभार आहे. संचालनालय स्तरावर तर यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.

संचालनालयामध्ये एक सहसंचालक तर गेल्या 15 वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहे. याविषयी विचारणा केली असता संचालनालयातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की सदर सहसंचालकांचे वरपर्यंत लागेबांधे असल्याने गेल्या 15 वर्षांपासून ते एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.

गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रासाठी विभागात पूर्णवेळ संचालक नाही. या विभागाला कोणी वाली नाही त्यामुळे प्रशिक्षण व कार्यसन यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मागील 5 वर्षापासून विभागात कोणतीही पदोन्नती झालेली नाही व दर महिन्याला सेवानिवृत्तीमुळे अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त होत आहेत. त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही.

आयटीआय निदेशक पदे ही 50 टक्के पेक्षा जास्त रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक निदेशकाकडे 2 ते 3 व्यवसाय अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी आहे. प्रशिक्षणार्थी आयटीआय मध्ये येतात व शिक्षक नसल्यामुळे प्रशिक्षण न घेता घरी परत जात असतात.

प्रशिक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्याचे अतोनात नुकसान होत आहे. या सर्व बाबीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व रिक्त जागा भरण्याबाबतची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com