नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

नुकत्याच ऑनलाईन पध्दतीने पार पाडलेल्या राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेतून राष्ट्रीय पातळीवर राज्यातील ३० विज्ञान प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यात नंदुरबार जिल्हयातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग व राज्य समन्वयक संस्था असलेल्या जिज्ञासा ट्रस्टच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात येणार्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे हे २८ वे वर्ष आहे. यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे जिल्हा समन्वयक संस्था वात्सल्य सेवा समिती, नंदुरबारतर्फे जिल्हा पातळी व राज्य पातळीवर बाल विज्ञान परिषद ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली होती.

यावर्षी ‘शाश्वत जिवनासाठी विज्ञान’ असा विषय होता. १० ते १७ वयोगटातील विद्यार्थ्याचे ३८ प्रकल्पांपैकी जिल्हा पातळीवर २१ प्रकल्प सादर केले होते. आणि त्यापैकी ४ प्रकल्पांची राज्यस्तरीय परिषदेसाठी निवड झाली होती.

त्यापैकी ३ प्रकल्प ओम श्रीराम कोचिंग क्लासेसचे व १ प्रकल्प वैदाणे हायस्कूलचा होता. या ४ प्रकल्पांपैकी ओम श्रीराम कोचिंग क्लासेसचा इ.७ वीचा विद्यार्थी प्रणव आशुतोष वडाळकर याचा ‘सोलर ऑपरेटेड मल्टीपरपज पॉवर बॅक’ या प्रकल्पाची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.