मोलगी परिसरात सात दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

बँकांचे व्यवहार ठप्प, नागरिक हैराण
मोलगी परिसरात सात दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

मोलगी | दि.४| वार्ताहर Molgi

मोलगी Molgi परिसरात गेल्या सात दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. असाही परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित Power outage होत असतो. मात्र, वीज बिल Electricity bill दर महिन्याला दोन ते तीन हजारांपर्यंत येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

मोलगी येथे पूर्ण परिसरासाठी ३३ के.व्ही.चे एकच सबस्टेशन असल्याने पूर्ण परिसर यावर अवलंबून आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा नेहमी खंडित असतो. बर्‍याच वर्षापासून सुरू असलेले सुरवाणी येथील १३२ के.व्ही.चे वीज वितरण उपकेंद्राचे काम अजूनही अपूर्णच असल्याने या सर्व समस्याना सामोरे जावे लागत आहे.

या उपकेंद्रास मागील शासन काळातील ऊर्जा मंत्री यांची भेट, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भगदरी दौर्‍याच्या वेळेस ही समस्या मांडण्यात आली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विद्युत उपकेंद्राला भेट देऊन कामाची पाहणी करून उप केंद्र लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तोच दुजोरा नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी ही दिला होता. परंतु हे काम अपूर्णच आहे.

मोलगी परिसरात मागील दोन महिन्यापासून वीज पुरवठा वारंवार खंडित असून मागील सात दिवसांपासून मोलगी परिसरात वीज नाही, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. टॉवरची रेंज नाही. ऑनलाईन शिक्षण बंद झाले आहे. पोल्ट्री सारख्या व्यवसायाला वीज नसल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पूर्वी घरात चिमणी (दिवा) पेटवायला रॉकेल भेटायचे पण तेही आता बंद असल्याने घरातील दिवासुद्धा पेटत नाही, अशी अवस्था मोलगी परिसरातील लोकांची झालेली आहे.

मोलगी परिसर हा नंदुरबार जिह्यातील उत्तर भाग असून तालुक्याचा दर्जाचा मोठा भाग आहे. म्हणून प्रशासन व लोक प्रतिनिधींनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण तालुक्यातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भागातील लोकांसाठी भौतिक सुविधांचा नेहमी बोलबाला असतो.

अक्कलकुवा येथील उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना वारंवार संपर्क करूनही ह्या समस्या सुटत नसल्याने परिसरातील लोकं आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता नर्मदेच्या काठापर्यंत वीजेच्या तारा पोहचल्या पण त्यात अजून विद्युतप्रवाह आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. अजून किती दिवस अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असा प्रश्न परिसरातील लोकांना पडलेला आहे.

आता आठवी ते बारावी पर्यंतच्या आदिवासी भागातील शाळा सुरू करण्याचे आदेश असले तरी परिसरातील इतर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्‍न कायम आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com