पोस्ट व बँका पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी

जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश
पोस्ट व बँका पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आलेले असताना खरीप हंगाम सुरु होत असल्याने शेतकर्‍यांना बी-बियाणे, अवजारे खरेदी, इतर व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी तसेच खावटी व इतर योजनेअंतर्गत अनुदान वाटपासाठी जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालय व बँका शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे

सर्व बँका व पोस्ट ऑफिस हे नियमित वेळेत व १०० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्यात यावा. शाखेमध्ये एका वेळेस फक्त ५ ग्राहकांना प्रवेश दिला जाईल.

बँक आणि पोस्ट कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राहक यांनी कोविड-१९ विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक राहील. यामध्ये शारिरिक अंतर ठेवणे, चेहर्‍यावर मास्क लावणे, हात सॅनिटाईज करणे आदी बाबींचा समावेश आहे.

ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँकेच्या शाखेमध्ये यावे. सर्दी, ताप, खोकला आदीचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे. याबाबत बँकेत दर्शनी भागावर सूचना फलक लावावा. ग्राहकांनी बँकेच्या काऊंटर पासून ३ ते ५ फुटाचे अंतर ठेवावे.

पोस्ट व बँकामध्ये एका काऊंटरवर एकावेळी एकच ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी, उर्वरित ग्राहकांना पोस्ट ऑफिस/बँकच्या बाहेर दोन ते तीन फुटाचे अंतरावर थांबण्याची व्यवस्था करावी.

पोस्ट ऑफिस व बँकेच्या एटीएममध्ये एकावेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरीत ग्राहकांना दोन ते तीन फुट अंतरावर थांबण्यास सांगावे. एटीएम मशीनचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

सर्व बँकांनी आपआपल्या शाखेतील एटीएम, कॅश/चेक डिपॉजिट मशिन, पासबुक प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. बँक इमारत व परिसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी.

ग्राहकांना इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, युपीआय, एटीएम कॅश डिपॉजिट मशिन या बँकेच्या इतर सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत बँकांनी प्रेरीत करावे.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com