शहादा येथे 11.25 रुपये दराप्रमाणे पपई तोड करणार

शहादा येथे 11.25 रुपये दराप्रमाणे पपई तोड करणार

शहादा - Shahada - ता.प्र :

उत्तर भारतात दिवसेंदिवस पपईच्या दरात वाढ होत आहे. परंतु त्यामानाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दर कमी मिळत आहे.

त्यामुळे उद्या दि.5 पासून 11 रुपये 25 पैसे दरानेच पपईची तोड व्यापार्‍यांना करु द्यावी, अन्यथा तोड बंद करावी, असे शेतकर्‍यांच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

दरम्यान, व्यापार्‍यांनी पाच दिवसांपुर्वी परस्पर बैठक घेवून 8 रुपयांचा दर ठरविल्याचे समजते. त्यामुळे यावर्षी पुन्हा पपईच्या दरावरुन शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपई दरासंबंधी पपई उत्पादक शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

त्यात इतर राज्यातील पपईच्या दराविषयी ऑनलाईन मार्केटचे दर तपासून पाहिले असता, सर्व मार्केटमध्ये 20 रुपयांवर दर आहे.

त्यामुळे सर्वानुमते बैठकीत पपईचा दर हा 11 रुपये 25 पैसे ठरविण्यात आला असून उद्या दि.5 पासून जे व्यापारी वरील दराने माल काढतील त्यांनाच पपई तोड करू द्यावी, अन्यथा तोड बंद ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शंकर पाटील, संजय पाटील, विशाल पाटील, राकेश पाटील, योगेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी आपले मते व्यक्त केली.

दरम्यान, व्यापार्‍यांची पाच दिवस अगोदर परस्पर बैठक झाली होती. त्यात त्यांनी स्वतः शेतकर्‍यांना विश्वासात न घेता आठ रुपये दर ठरवला असल्याचे समजते.

याविषयी त्यांनी सोशल मीडियावर मॅसेजही व्हायरल केले होते. इतर राज्यात पपईचे दर वीस रुपयांच्या वर असूनही व्यापारी मात्र शेतकर्‍यांकडून अल्प दरात पपईची खरेदी करत आहेत. त्यातून व्यापार्‍यांना भरघोस नफा मिळत आहे.

शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. त्यामुळे पपईचा दर निश्चित करण्यासाठी आज शेतकर्‍यांनी बैठक बोलावली त्यात मात्र व्यापारी उपस्थित नव्हते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com