नंदुरबार | प्रतिनिधी - Nandurbar

अक्कलकुवा येथील ग्राम पंचायतीतील पावणे पाच कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालिन ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.जाधव, तत्कालिन प्रशासक एम.आर.देव, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी आनंदा पाडवी, तत्कालिन ग्रामसेवक सुकलाल कोळी यांच्यावर शिस्तभंगाबाबत विभागीय चौकशी करण्यासह ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, तत्कालिन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार अपात्रतेचा प्रस्ताव नवीन विहित नमुन्यात विनाविलंब सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा यांनी केली होती. याबाबत कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पंचायत समितीसमोर उपोषणास सुरुवात केली. या उपोषणाची दखल घेत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना काही बाबींमध्ये अनियमितता व काही ठिकाणी अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी यांना संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इंद्रपालसिंह राणा यांनी उपोषण स्थगित केले आहे.

अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत विविध विकासकामांमध्ये अपहार झाल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी करुन तत्कालिन प्रशासक, तत्कालिन सरपंच, विद्यमान सरपंच, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, तत्कालिन ग्रामसेवक यांना अंतिम कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवाल देखील सादर करण्यात आला होता.

सदर अहवालानुसार अक्कलकुवा ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये अनियमितता व अपहार झाल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणा यांनी केली होती. या प्रकरणी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी गटविकास अधिकारी यांना गोपनिय अहवालानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार तत्कालिन ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.जाधव, तत्कालिन प्रशासक एम.आर.देव, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी आनंदा पाडवी, तत्कालिन ग्रामसेवक सुकलाल कोळी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अक्कलकुवा गसरपंच राजेश्वरी वळवी व तत्कालिन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच ताज महंमद मक्राणी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार अपात्रतेचा सविस्तर प्रस्ताव नवीन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कारवाईचे आश्वासन मिळाल्याने इंद्रपालसिंह राणा यांनी उपोषण स्थगित केले आहे. यावेळी गटविकास अधिकारी महेश पोतदार, नासीर बलोच, शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी उपस्थित होते.