महामार्ग दुरुस्तीचा 'पैसा गेला पाण्यात'

पहिल्याच पावसाळ्यात पडले महाकाय खड्डे
महामार्ग दुरुस्तीचा 'पैसा गेला पाण्यात'

नवापूर - Navapur - श.प्र :

तालुक्यातील बेडकीपाडा ते धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाची डागडुजी नुकतीच करण्यात आली. परंतू पहिल्याच पावसात महामार्गाची चाळनी झाल्याने महामार्ग दुरूस्तीचा पैसा पाण्यात गेला आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदार बिल अदा न करता पुन्हा दुरूस्ती करण्याची सुचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांनी द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

नवापूर शहरातील रंगावली पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाल्याने खड्डे चुकवायच्या नादात अनेकांचे अपघात होतात. मोठे खड्डे पडल्याने वाहनाचे तळदेखील खाली ठोकले जातात. रायंगण गावात महाकाय खड्डा पडला आहे. याठिकाणी पुल खचून गेल्याने पुल दुरूस्तीचे काम गेल्या वर्षापासून संथगतीने सुरू आहे.

खड्ड्यांमुळे अपघात होऊन वाहन चालकांचे जीव जात आहेत. संबंधित विभाग महामार्गावरील दुरूस्ती करण्याच्या तयारीत दिसत नाही. वाहनांचे नुकसान व दुखापतीचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी तात्पुरत्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. परंतू दरवर्षी परिस्थिती जैसे थे होते. यासाठी ठोस उपाययोजना संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी करण्याची गरज आहे.

नवापूर तालुक्यातील महामार्गावर ठिकठिकाणी एक दोन फुटाचे खड्डे पडले आहे. वाहन चालकांना सावकाश वाहन चालवावे लागते. यात वेळ व इंधनाची नासाडी होत आहे. तसेच रायंगण पूल, रंगावली पुलाजवळ व नवापूर शहरात जवळील रेल्वेगेट तसेच चार-पाच ठिकाणी इतके मोठे खड्डे पडले आहेत. त्यात छोट्या चारचाकी वाहनाना कसरत करावी लागते.

राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता बर्‍याच ठिकाणी खचला आहे. शहरातील देवळफळी परिसरात या रस्त्याची अवस्था तर वाईट झाली आहे. रस्ता चक्क एक फूट खचला असून त्यात अवजड वाहने फसू लागली आहेत. भविष्यात अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु या रस्त्यावर देखरेख करणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com