जि प बांधकाम सभापतीपद अखेर शिवसेनेकडे

जि प बांधकाम सभापतीपद अखेर शिवसेनेकडे

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

येथील जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतीपद अखेर (Shivsena) शिवसेनेच्या वाटयाला आले आहे. सदर बांधकाम सभापतीपद आता उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्याकडे आले असून विद्यमान बांधकाम सभापती अभिजीत पाटील यांच्याकडे कृषि व पशुसंवर्धन सभापतीपद देण्यात आले आहे. या खांदेपालटबाबत अभिजीत पाटील यांनी कायदेशीर बाबी पडताळून पहाव्यात, अशी मागणी करणारे पत्र जि.प.अध्यक्षांना दिदले आहेत. दरम्यान, महिला व बालविकास विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या पोषण आहारात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असल्याने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

येथील जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी होत्या. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष राम रघुवंशी, विविध समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपस्थित होते. यावेळी अजेंडयावर 29विषय घेण्यात आले होते. हे सर्व विषय मंजूर करण्यात आले.

जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करतांना शिवसेनेला उपाध्यक्षपदासह बांधकाम सभापतीपद देण्यात येईल असे ठरले होते. परंतू सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेच्या वाटयाला केवळ उपाध्यक्षपद आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ताधार्‍यांमध्येच अंतर्गत धुसफूस सुुरु होती. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतराचे वारे वाहू लागले होते. परंतू दरम्यानच्या काळात शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये समेट झाल्याने बांधकाम सभापतीपद शिवसेनेला देण्याचे ठरले.

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 7 हा खातेबदलाचा होता. यावेळी जि.प.उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्याकडे असलेले कृषि व पशुसंवर्धन सभापतीपद हे विद्यमान बांधकाम सभापती अभिजीत पाटील यांच्याकडे देण्यात आले. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. परंतू अभिजीत पाटील यांनी खातेपालट करतांना कायदेशीर बाबी तपासून पहाव्यात याबाबत जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांना लेखी अर्ज सादर केला. त्यावर त्यांनी कायदेशीर बाबी तपासल्या जातील, असे आश्वासन दिले.

दरम्यान, आजच्या सभेतील सर्वच विषय मंजूर झाले. महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी पोषण आहार योजना अनेक ठिकाणी पोहचलेली नाही. जिल्ह्यात 23 हजार गर्भवती माता व 3 ते 6 महिन्यांचे 1 लाख 45 हजार बालकांना पोषण आहार लॉकडाऊन नंतर देण्यात आलेला नाही. गेल्या आठ दिवसापासून पोषण आहार पोहोचलेला आहे. पोषण आहारापासून वंचित ठेवणार्‍या ठेकेदारावर प्रशासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येऊन सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी जि.प.सदस्य धनराज पाटील यांनी केली.

नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक गटातील सदस्य संगीता भरत गावित यांनी नवापूर तालुक्यातील प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला तडा गेला असून, प्रसूती गृहाची खोली व ओटी मधील ओटा खचलेला आहे. संपूर्ण इमारत कमकुवत झाली आहे. आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडीत असताना केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी तीन वेळेस पत्रव्यवहार केला असताना देखील दखल घेण्यात आलेली नाही. इमारत नूतनीकरण करण्याची नितांत गरज असून कोणतीही जीवित हानी होऊ नये उपायोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com