शैक्षणिक विकासाच्या डेल्टा रँकींगमध्ये नंदुरबार देशात दुसरा

देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून क्रमवारी जाहीर
शैक्षणिक विकासाच्या डेल्टा रँकींगमध्ये नंदुरबार देशात दुसरा
USER

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डेल्टा रँकींगमध्ये शैक्षणिक विकासाच्या संदर्भात नंदुरबार जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. या चांगल्या कामगिरीबद्दल पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर दंतेवाडा, तिसर्‍या, बस्तर चौथ्या आणि आसाममधील बक्सा जिल्हा पाचव्या स्थानावर आहे. शिक्षण या उपक्रमांतर्गत एकूण ८ निर्देशांकापैकी शिक्षण विभागाने सर्वच बाबतीत चांगली कामगिरी केली आहे.

पाचवी ते सहावीतील संक्रमणदर ९९.५६ टक्के असून ८ वी ते ९ वी वर्गातील संक्रमणदर ९३.३३ टक्के आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून विद्यार्थी दूर जाणार नाही म्हणून वैयक्तिक लक्ष देण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे.

एप्रिल २०१८ मध्ये ७७.११ टक्के असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या जानेवारी २०२१ मध्ये ९२.९३ टक्क्यांवर आली आहे. यासाठी आकांक्षित जिल्हा निधीतून ६५ स्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ५०६ शाळांची रंगरंगोटी करण्यात आली असून १४८ वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ६० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

एकूण १५६ शाळांमधील ३१५ वर्गखोल्यांचे निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ३१५ शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. ३८४ शाळांमध्ये सोलर डिजीटल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

१५ ते ४५ वयोगटातील स्त्री साक्षरतेसंदर्भात एप्रिल २०१८ मध्ये ४६.१० असणारे प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ८१.८१ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थी-शिक्षक संदर्भात असलेले ९३.१५ टक्के प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ९८.७८ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानीत शाळांमधील १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली प्रगती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दुर्गम भागातील शाळांमध्ये अधिक चांगल्या सुविधा करण्याचे निर्देश दिले आहेत. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचेदेखील मार्गदर्शन लाभले आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीदेखील जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com