नंदुरबार

गूढ आवाजाने नंदुरबार हादरले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

‘सुपर सोनिक बूम’ असल्याचे स्पष्ट

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक स्फोटसदृष्य गुढ आवाज होवून घरे हादरली. सोबतच विमानाचाही आवाज आल्यामुळे अनेक नागरिकांनी भयभीत होवून घराबाहेर पडले. मात्र, हा आवाज ओझर मिग या लढावू विमानांचा ‘सुपर सोनीक बुम’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही जिल्हयात विमानाचा अपघात झाल्याची अफवा पसरली होती. मात्र ती अफवाच होती.

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक मोठा स्फोटसदृष्य आवाज झाला. हा आवाज झाल्याबरोबरच अनेक घरे हादरली तसेच काही घरांच्या काचा फुटल्या. सोबतच विमानाचाही आवाज आल्याने नागरिक भयभीत झाले. हा आवाज इतका भयंकर होता की लोकांना भुकंप झाल्याचे समजून नागरिक घराबाहेर पडली. सुरुवातीला हा आवाज कसला होता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा आवाज जिल्हयातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, खांडबारा परिसरातही जाणवला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. काही वेळानंतर नटावद, धानोरा, कोठली परिसरात विमानाचा अपघात होवून 30 ते 40 लोकांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. याबाबत सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचे छायाचित्रही व्हायरल करण्यात आले. मात्र, ते सर्व बनावट फोटो होते. परंतू या फोटोंमुळे अफवा मोठया प्रमाणावर पसरल्या. नंदुरबारच्या नागरिकांना बाहेर गावाहून बाहेरच्या जिल्हयातूनही फोन करुन विचारणा करण्यात येत होती.

दरम्यान, नाशिक येथील ओझर मिग कंपनीच्या लढावू विमानांची चाचणी सुरु आहे. सदर विमानांचा वेग हवेच्या वेगापेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या वेगामुळे ध्वनीलहरी वेगात जमिनीवर येवून मोठा स्फोटसदृष्य आवाज होत असतो. त्यालाच सुपर सोनीक बुम म्हटले जाते. आज दुपारी नंदुरबारातून असे लढावू विमान गेल्याने त्याचा मोठा स्फोटसदृष्य आवाज झाला होता. मात्र, या आवाजामुळे अनेक घरे हादरली तसेच घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. या आवाजामुळे अफवांचे पेवही फुटले. विमानाचा स्फोट तसेच भुकंप झाल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

नंदुरबारमध्ये झालेल्या मोठ्या आवाजाबाबत विमान पडल्याच्या अफवाचे फोन येत असल्याने त्याची पडताळणी करण्यात आली. एटीसी मुंबई व हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिकल नाशिक येथून माहिती घेतली असता, सुपरसॉनिक बुम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून पुणे, नाशिक व नाशिक एचएएलच्या हवाई कार्यक्षेत्रात सरावासाठी आले होते. नंदुरबार हा भाग नाशिक एचएएलच्या फ्लाईंग एरीयामध्ये येतो. सदर विमान सुखरूप परत पोहोचले असल्याचे एटीसीने स्पष्ट केले आहे. हे विमान कमी उंचीवरुन उडत असल्यास सुपर सॉनिक बुम या सराव प्रकारात अशाप्रकारे प्रचंड मोठा आवाज होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com