नवापूर - Navapur - श.प्र. :

तालुक्यातील विसरवाडी येथे ऑईल फिल्टर विक्रीच्या कारखान्यासह आजुबाजूच्या चार ते पाच घरांना आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विसरवाडी ग्रामपंचायतीच्या मागील गल्लीत दिनेश प्रकाश जयस्वाल यांच्या राहत्या घराच्या पुढील भागात जुने ऑईल फिल्टर विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.

रहिवासी परिसरात त्यांनी हा कारखाना सुरु केला आहे. दरम्यान, आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने क्षणभरात आगीने रौद्ररुप धारण केले. यामुळे कारखाना घरासह जळून खाक झाला आहे.

आज विसरवाडी गावात आठवडे बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. आगीचे रौद्र रूप बघून बाजारासाठी आलेले लोक सैरावैरा पळत सुटले.

आजुबाजुच्या चार ते पाच घरांना आगीने विळखा घातल्याने परिसरातील राहणारे लोक जीव वाचवण्यासाठी पळत सुटले.

अग्निशमन दलाला फोन करुनही लवकर हजर न झाल्याने आग सर्वत्र पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, कॉ.प्रदिप वाघ, अतुल पानपाटील, दिनेश चिते, देवरे, भगवान गुटे यांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्याचे प्रयत्न केले.

परंतु आगीचे रौद्र रूप पाहता लाखो रुपयांची हानी झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ग्रामपंचायत कर्मचारीही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते.

आगीमुळे वीज पुरवठा लाईन केबल जळून खाक झाले असून या आगीमुळे विसरवाडी परिसरात खळबळ उडाली आहे