‘भोला’ सापडतो, ‘होला’ का नाही ?

Gutakha
Gutakha

नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला लॅपटॉप चोरी करणारा ‘भोला’ अवघ्या चोवीस तासात कुठलाही पुरावा नसतांना सापडतो. मात्र, दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी करणारा व अनेकवेळा गुन्हे दाखल असलेला ‘होला’ पोलीसांना कसा सापडत नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून तत्कालीन शासनाने सन 2012 पासून राज्यात गुटखाबंदी केली आहे. गुटख्यातून राज्य शासनाला सुमारे 100 कोटीचा महसूल मिळत होता. तरीही राज्यात गुटखा तसेच पानमसाल्याची निर्मिती, साठवणूक, वितरण तसेच विक्रीवर पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. परंतू शेजारच्या गुजरात राज्यात गुटख्यावर बंदी नाही. गुटखा शौकिनांची संख्या कोटयावधींच्या घरात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बंदी असतांनाही दररोज कोटयावधी रुपयांची उलाढाल गुटखा खरेदी विक्रीतून होत आहे.

नंदुरबार हा गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेला जिल्हा आहे. शहराच्या मुख्यालयापासून 10-15 किलोमीटरवरच गुजरात राज्याची सिमा आहे. नंदुरबार येथील गुटखातस्कर होलाराम सिंधी याचे गुजरात राज्यातील निझर, वेळदा, बाळदा, कुकरमुंडा आदी ठिकाणी गुटख्याची गोदामे आहेत. या गोदामांमध्ये दररोज कोटयावधी रुपयांचा गुटखा, पानमसाला साठवला जातो. याशिवाय काका सुपारी, शंकरशेठ, दोंडाईचाचा अग्रवाल असे एक ना अनेक गुटखातस्कर दररोज कोटयावधीच्या गुटख्याचा पुरवठा उत्तर महाराष्ट्रात करतात. गोदामांमधून रात्रीच्या अंधारात कधी वाळूच्या डंपरमधून, कधी टेम्पो, कधी ट्रक, कधी आयशर अशा वाहनांमधून गुटख्याची तस्करी केली जाते. यातून दररोज कोटयावधी रुपयांची उलाढाल होत असते. संबंधीत गुटखातस्करचे गुजरातपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील यंत्रणेशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने त्याचा माल पकडला जात नसल्याचे सांगण्यात येते. पकडला गेला तरी त्या मालाचे पुढे काय होते? सदर माल नष्ट करण्याचे आदेश दिले जातात. परंतू हा माल खरोखर नष्ट केला जातो का? याबाबत माहिती उजेडात येत नाही. म्हणूनच की काय गुटखा तस्करीच्या वाहनापुढे गुटखातस्कराची कार चालत असते. रस्त्यात माल पकडला गेला की रात्रीच्या अंधारातच प्रकरण ‘रफादफा’ केले जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, महेंद्र पंडीत यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून अभिनंदनीय कामगिरी करत जिल्हयातील सर्वत्र अवैध धंदे बंद केले आहेत. त्यामुळे सट्टा, जुगार पूर्णपणे बंद आहेत. परंतू असे असतांना जिल्हयातून दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी होत आहे. गुटखातस्करदेखील पोलीसांना माहिती आहेत. त्यामुळे श्री.पंडीत यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देवून संबंधीतांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

सध्या कोरानाने थैमान घातलेले असल्याने मार्च महिन्यापासून देश लॉकडाऊन होता. मात्र, या लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत या गुटखातस्कराने तिप्पट, चौपट भावाने विक्री केली. म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात विमल गुटख्याची 10 रुपयाला मिळणारी पुडी तब्बल 40 ते 50 रुपयांना, 5 रुपयाला मिळणारी पंढरपुरी, गायछाप तंबाखू 15 ते 20 रुपयांना विक्री झाल्याचे गुटखाशौकिनांकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारचे व्यवसाय ठप्प असतांना, लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असतांना फक्त गुटखा आणि दारुची जोमात विक्री होवून विक्रेते ‘गब्बर’ झाले आहेत. दरम्यान, दि.16 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री रोजी गुजरात राज्यातून निझरमार्गे नंदुरबार येथे महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा वाळूची वाहतूक करणारा आयवा डंपर नंदुरबाच्या दिशेने येतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला होता. त्यात 9 लाख 67 हजार रुपयांचा गुटखा होता. डंपरमधील आकेश काशिनाथ नाईक, मनिष गणेश ठाकरे, नरेश विनोद पाडवी, राहुल भिका पाडवी (सर्व रा. नळवा बु.ता.जि. नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. चालक नरेंद्रसिंग राजपूत याने सदर विमल गुटख्याचा माल होलाराम सिंधी याच्या निझर येथील गोडावूनमधून भरुन आणल्याचे सांगून सदर माल कुठे पोहचावा याची माहिती तो नंदुरबारला आल्यावर देणार असल्याची कबुली दिली होती. त्यावेळी होलाराम सिंधीसह चौघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फक्त गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दि.18 जून रोजी पथराई ता.नंदुरबार येथील फाटयावर गुजरात राज्यातून नंदुरबारमार्गे शिंदखेडा येथे अवैधरित्या विक्रीसाठी जाणारा 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुसाठा पोलीसांनी जप्त केला. हा मालदेखील होलाराम सिंधी याच्या निझर येथील गोडावूनमधुन क्रुझर गाडीमध्ये भरुन नंदुरबारमार्गे शिंदखेडा येथे देविदास पितांबर चौधरी याच्याकडे घेवून जात असल्याचे चालकाने पोलीसांना सांगितले. त्यामुळे गुटखा वाहतुक करणारे चालकासह होलाराम सिंधी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या होलाराम सिंधीकडून नंदुरबारात दररोज किमान 100 मोटरसायकलींवरुन लाखो रुपयांचा गुटखा नंदुरबारात आणला जातो. हा गुटखा पानटपर्‍यांवर पुरवठा केला जातो. याशिवाय छोटेमोठे टेम्पो, रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांमधूनही मोठया प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जाते. परंतू याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.

पोलीसांनी गुटखा पकडल्याचे असंख्य गुन्हे दाखल केले आहेत. परंतू खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे असल्याचे दिसून येत आहे. कारण लाखो रुपयांचा माल पकडून कारवाई केल्याचे पोलीसांकडून दाखवण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात निझरसह गुजरातमधील होलाराम सिंधीच्या गोदामांमधून दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी केली जाते, तो माल कुठे जातो? त्यातही वाहन चालक, सहचालकांवर किरकोळ स्वरुपाचे कलम लावून कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतर त्या गुन्हयाचे काय होते? पकडलेला गुटखा कुठे जातो? गुटखा नष्ट केला जातो की पुन्हा विक्री करायला संबंधीतांना परत केला जातो, याबाबतची माहिती कधीही उघड होत नाही. बर्‍याचवेळा पोलीस ठाण्यापर्यंतही प्रकरण जात नाही. त्यामुळे पोलीसांकडून गुटख्यावर होणारी कारवाई केवळ फार्स असल्याचे दिसून येते. याशिवाय नवापूर तालुक्यातील खांडबारा, भादवड याठिकाणीदेखील काही गुटखातस्करांचे गोदाम आहेत. तेथूनही अशाचप्रकारे गुटख्याची तस्करी केली जाते.

दरम्यान, निझर, वेळदा येथे काही जणांना या गुटखातस्कराला ‘टोल’ द्यावा लागतो. टोल मिळाल्याशिवाय त्याचे वाहन महाराष्ट्रात जावू दिले जात नाही, अशीही माहिती प्राप्त झाली आहे. याशिवाय अन्न व औषधी प्रशासन विभागाचेही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या विभागालाही संबंधीत तस्करांकडून ‘मॅनेज’ केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुटखा पकडल्यानंतरही या विभागाला कोणतीही माहिती नसते किंवा माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यावरुन होलाराम सिंधीचे गुजरात राज्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सर्वच यंत्रणेशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचेच दिसून येते. म्हणूनच की होलाराम सिंधीला कधी अटक झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे 24 तासात भोला सापडतो मग होला का नाही? असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. अर्थात हे खाकीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com