नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार लोकसभा मतदार संघातील 90 हजार महिलांना पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा धूरमुक्त होणार आहे. यासाठी संबंधीत लाभार्थ्यांनी संबंधीत गॅस कंपनीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत केले.

खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या, आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 1 कोटी महिलांना उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस देण्याचे जाहीर केले आहे. यात नंदुरबार जिल्हयातील 90 हजार महिलांना गॅसचा लाभ देण्यात येणार आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये दीड लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. यासाठी संबंधीत महिलांना संबंधीत गॅस कंपनीत जावून आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 90 हजार लाभार्थ्यांना लाभ दिल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदार संघ हा धूरमुक्त होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खा.डॉ.गावित पुढे म्हणाल्या, जिल्हयातील 57 हजार स्थलांतरीत कुटूंबांना कामगार योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे नुकतेच पोर्टल विकसीत करण्यात आले असून त्या पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केल्यास योजनांचा लाभ मिळणार आहे. देशातील 602 जिल्हयांमध्ये क्रीटीकेअर हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. यात नंदुरबार जिल्हयाचाही समावेश आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य शाळा प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणार आहे. देशातील 112 आकांक्षित जिल्हयात नंदुरबार जिल्हयाचा समावेश असल्याने केंद्राच्या बहुतांश योजनांचा लाभ मिळणार आहे. देशात 100 सैनिकी शाळा सुरु करण्यात येणार आहेत, यात नंदुरबारमध्येही एक सैनिकी शाळा सुरु होणार आहे. तसेच नंदुरबारला टेक्सटाईल पार्कसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील चार ठिकाणी मेडीकल इक्विपमेंट डीव्हाईस पार्क सुरु करण्यात येणार आहेत. यापैकी एक डीव्हाईस पार्क हे नंदुरबार येथे सुरु करण्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असल्याचेही डॉ.गावित यांनी यावेळी सांगितले.