भालेर येथील अनोळखी युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
भालेर येथील अनोळखी युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक
Crime

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

तालुक्यातील भालेर येथे अनोळखी युवकाच्या डोक्यात वार करुन खून करणार्‍या तीन आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.पवार म्हणाले, दि.26 जून 2021 रोजी सकाळी 8 वाजेच्यासुमारास तालुक्यातील भालेर येथे शासकिय आश्रमशाळेच्या बाजुला असलेल्या शेताच्या बांधालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

सदर अनोळखी मृतदेह हाफ पँटवर व रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेला होता. मृत व्यक्तीच्या अंगावर, डोक्यावर मारहाण केल्याच्या व जखमेच्या खूणा होत्या. याबाबत नगांव गावाचे पोलीस पाटील प्रशांत मगरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनास्थळावर मयताची ओळख पटु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. तसेच सदर गुन्हा रात्रीच्या अंधारात घडला असल्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मयताची ओळख पटविण्याचे तसेच जिवेठार मारण्याचा उद्देश याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.

त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 5-5 अंमलदारांचे 6 पथक तयार करण्यात आले होते. दि.28 जून 2021 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकास दि. 25 जून 2021 रोजी नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात 4 इसम हे त्यांच्यातीलच एक इसम हा रेल्वेतुन निघुन गेला असल्याबाबत माहिती मिळाली. अधिक माहिती घेतली असता हावडा (प.बंगाल) येथील 5 इसम भरुच (गुजरात) येथे मजुरी करण्यासाठी जात असतांना त्यातील एक तरुण नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरुन गेला अशी त्रोटक माहिती मिळाली.

त्यावरुन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार भरुचला रवाना झाले. तेथे त्या 4 अनोळखी व्यक्तीचा शोध घेवून त्यांना मयताचा फोटो व त्याच्या हातावर गोंदलेले दाखविले असता त्यांनी मयतास ओळखुन मयत दिपक सुकरा उराव (वय-26, रा.शिमन लेन, मथुरा, बागान, मथुरा टी गार्डन ता.जि.अलिपुरदुआर जलपैगुडी पश्चिम बंगाल) असे सांगुन मयताची ओळख पटविण्याबाबतचा पहिला टप्पा पार करण्यात पथकाला यश आले होते.

परंतु सदर मयत इसमाचे मारेकरी कोण? त्यास का मारण्यात आले? मारण्याचा उद्देश काय? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे होतेच. त्यामुळे मयताच्या चारही मित्रांना भरुच गुजरात येथुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार येथे आणले व त्यांच्याकडे सखोल विचारणा करुनही गुन्ह्याबाबत व आरोपीतांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती. दि.30 जून 2021 रोजी एका गुप्त बातमीदाराने बातमी मिळाली की, दि.25 जून 2021 रोजी रात्रीच्या सुमारास भालेर येथील नविन वस्तीगृहाचे सुरु असलेल्या बांधकामाजवळील रस्त्यावर भिक्या (रा.भालेर ता.जि.नंदुरबार) व त्यासोबत 2 इसम एका तरुणाला मारहाण करीत होते. त्यावरुन भालेर गावात भिक्या नावाच्या व्यक्तीची माहिती काढून शोध घेवुन त्यास शेतातून ताब्यात घेतले. त्याचे नांव भिका गैंदल पाटील (वय-26 रा.भालेर ता.जि. नंदुरबार) असे सांगितले. त्याची विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, दि.25 जून रोजी रात्री 9.30च्या सुमारास तो तसेच प्रकाश हिरामण पाटील व मुकेश गैंदल पाटील असे मोटार सायकलने नंदुरबारकडे जात असतांना रस्त्यात एका अनोळखी तरुणाने त्यांना भालेर गावाचे प्राथमीक आरोग्य केंद्राच्यापुढे शिवीगाळ करुन प्लॅस्टीकच्या पाईपने मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावरुन त्यांच्यात वाद विवाद होवुन त्या तिघांनी अनोळखी तरुण यास लाकडी काठी, दगड हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यास अनोळखी इसमाने देखील प्रतिकार केला व तिन्ही आरोपीतांच्या ताब्यातुन तो इसम पळून तेथुन वस्तीगृहाचे बाजुला असलेल्या शेताकडे गेला. त्यानंतर तिघांनी त्याचा पाठलाग करुन त्यास वस्तीगृहाच्या बाजुला असलेल्या शेतात पकडले व तेथे पुन्हा मारहाण करुन डोक्यात लाकडी काठी मारुन गळा आवळला. त्यामुळे अनोळखी इसम मयत झाला. त्यानंतर मुकेश गैंदल पाटील व प्रकाश हिरामण पाटील हे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे उघड झाले.

कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक श्री.महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व संपुर्ण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सर्व अमंलदारांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com