अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पाच महिन्यांचा गर्भपात : पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीला गर्भवती केल्याप्रकरणी तसेच गर्भपात करुन भ्रृणहत्या करणार्‍या नराधमावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राम्हणपुरी (ता.शहादा) येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या आदिवासी कुटूंबातील अल्पवयीन अकरा वर्षीय मुलीवर एका युवकाने वारंवार बलात्कार केला. त्यामुळे सदर मुलगी गर्भवती राहिली.

परिवाराच्या सदस्यांना ही बाब लक्षात आली असता त्यांनी मुलीला विचारणा केली. तिने घडलेला प्रकार सांगितला. मात्र, घडलेली घटना कोणाला माहिती पडू नये यासाठी या अल्पवयीन मुलीचा पाच महिन्याचा गर्भपात करण्यात आला.

यासाठी गावातील ओळखीच्या डॉक्टर व नर्सच्या मदतीने मध्यप्रदेशातील खेतिया येथील जंगलात नेऊन अनधिकृतरित्या गर्भपात करण्यात आला. या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी पीडित मुलीला देण्यात आली.

दरम्यान, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी नराधम व इतर तिन्ही साथीदारांना पकडण्याचे आदेश दिले.

सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, गोपनीय शाखेचे मणिलाल पाडवी, मेहरसिंग वळवी, पोकॉ राकेश मोरे, मुकेश राठोड, पो.कॉ.धिरसिंग वळवी, दिनकर चव्हाण, भरत उगले, किरण जिरेमाळी यांच्या पथकाने पंकज पाटील याला सुलतानपुर शिवारातील शेतातून ताब्यात घेतले. गर्भपात करणार्‍या डॉक्टर व नर्स यांचा तपास सुरू आहे.

याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम 376, 376इ, 313, 318, 506, 34 व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण, अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुख्य सूत्रधार पंकज मंगा पाटील, अंबालाल पाटील, शांत्या पाटील, भुर्‍या शांत्या पाटील रा. ब्राम्हणपुरी यांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टर व नर्स फरार आहेत. पुढील तपास अतिरिक्त एस.डी.पी.ओ संभाजी सावंत करित आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com