गोडावूनमधुन टीव्ही चोरणार्‍या तिघांना काही तासातच अटक

एलसीबीची कारवाई
गोडावूनमधुन टीव्ही चोरणार्‍या तिघांना काही तासातच अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

शहरातील आदर्शनगर येथील गोडावुनमधून टीव्ही चोरणार्‍या तिघा चोरटयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 87 हजार 47 रुपये किमतीच्या 4 एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील तळोदा रोड लगत असलेल्या आदर्शनगर येथील टीव्ही गोडावूनमधुन दि. 24 ते 25 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे शटर कापून 1 लाख 87 हजार 47 रुपये किमतीच्या 43 इंची 4 एलईडी टीव्ही चोरुन नेल्या होत्या.

याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोना दादाभाई मासुळ, राकेश मोरे, पोकॉ मोहन ढमढेरे, आनंदा मराठे, सतीष गुले यांचे पथक स्थापून गुन्ह्याचे तपासाबाबत मार्गदर्शन केले.

मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार करजकुपा गावातून दीपक कृष्णा वळवी, विकास उर्फ आका गणेश ठाकरे, नरेंद्र उर्फ युवराज ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवी केली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी घरफोडी केल्याचे मान्य करुन शेतात चार्‍याच्या गंजीमध्ये लपविलेल्या 2 टीव्ही व बांधावर असलेल्या मोठया गवतामध्ये 2 टीव्ही अशा एकूण 1 लाख 87 हजार 47 रुपये किमंतीच्या 4 एलईडी टीव्ही काढुन दिल्या. आरोपींना ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोना दादाभाई मासुळ, राकेश मोरे,पोकॉ मोहन ढमढेरे,आनंदा मराठे सतिष गुले यांच्या पथकाने केली. घरफोडी झाल्यानंतर अवघ्या काही तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमालदेखील हस्तगत केल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com