तळोदा-अक्कलकुवा तालुक्यात पावणे तीन लाखांचा दंड वसूल

मोदलपाडा, ता.तळोदा - Modalpada - वार्ताहर :

करोना विषाणू संसर्गाला अटकाव घालण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुनही ज्या नागरिकांनी नियम-अटींचे उल्लंघन केलेल्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

तळोदा-अक्कलकुवा उपविभागातील पोलिसांनी दि.14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कोविड 19 चे नियम न पाळणार्‍या नागरिकांडून तब्बल 2 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

करोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची मोठी दहशत होती. तशाही स्थितीत अनेक नागरिक नियम मोडत, अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे अनेकदा पोलिसांनाही कठोर भूमिका घ्यावी लागली. करोनाची दहशत असतांनादेखील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना दंड भरावा लागला.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळाल्याने कारवाईदेखील कमी झाली. मात्र, पुन्हा एकदा तळोदा व अक्कलकुवा शहरातील व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने, बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा कारवाई सुरू केली आहे.

यामध्ये मोलगी पो.स्टे. 56 हजार, अक्कलकुवा पो.स्टे. 1 लाख 23 हजार 400, व तळोदा पो.स्टे. 92 हजार असा एकूण 2 लाख 72 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एवढया मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनसुध्दा आजही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे दंडाच्या रकमेत पुन्हा वाढ होणार आहे. दंड भरण्यापेक्षा नागरिकांनी नियम पाळून कोरोनाला हद्दपार करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियम तोडणार्‍या नागरिकांना समज मिळावी याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणार्‍या नागरिकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे.

अशाप्रकारच्या दंडात्मक कारवाईतून सर्वच नागरिकांना या गोष्टींचे महत्व कळावे ही मुख्य भूमिका आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com