प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यास सुरूवात

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी आणि जि.प.अध्यक्षा सीमा वळवी यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 60 विलगीकरण कक्ष तयार करण्यास सुरूवात केली आहे. लक्षणे नसलेल्या करोना बाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहेत.

जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी विलगीकरण कक्षांच्या नियोजनाबाबत गट विकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.

एकही बाधित व्यक्ती गावात न फिरता किंवा घरी न थांबता अलगीकरण कक्षात उपचार घेईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

लक्षणे नसलेले कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार होण्यासाठी फिरत्या पथकामार्फत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा नागरिकांना इतर नागरिकांपासून तात्काळ वेगळे करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

सदर सर्व विलगीकरण कक्ष त्या-त्या ग्रामपंचायतीमार्फत चालवली जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णाची दिवसातून 2-3 वेळा तपासणी करून औषधोपचार करतील.

रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.त्यामुळे रुग्णांना गावातच किंवा जवळच्या प्राथमिक केंद्राच्या ठिकाणी उपचार मिळणार आहेत.

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी स्वत:हून अलगीकरण कक्षात दाखल झाल्यास इतरांना होणारा संसर्ग टाळता येईल आणि कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.

तसेच वेळेवर उपचार झाल्यास बाधित व्यक्तीची प्रकृती अधिक खराब होणार नाही. मंगळवार पर्यंत या कक्षात 50 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार असून त्यानंतर गरजेनुसार 100 पर्यंत बेड्स वाढविण्यात येणार आहेत. अशाप्रकारे येत्या काळात प्रा.आ.केंद्र स्तरावर 6000 बेड्सची क्षमता लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हेाऊ शकेल.

आरोग्य विभाग, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्यांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. नियोजनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक समन्वयक अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी शेखर रौंदळ यांचेकडे नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती श्री.गावडे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com