वडाळी गाव ठरतेय हॉटस्पॉट
नंदुरबार

वडाळी गाव ठरतेय हॉटस्पॉट

एकाच दिवशी आढळले 18 करोना रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

बामखेडा - Bamkheda - वार्ताहर :

वडाळी ता.शहादा येथे एकाच दिवशी तब्बल 18 कोरोना रूग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे वडाळी हे गाव जिल्हाच्या ग्रामीण भागातील कोरोना हॉटस्पॉट ठरु पाहत आहे.

शहादा तालुक्यातील मोठया बाजारपेठेचे गाव तसेच मिनी तालुका म्हणून प्रसिद्ध असलेले वडाळी हे गाव आतापर्यंत सुरक्षित मानले जात होते. कोरोना संकटावर आतापर्यंत यशस्वी मात करणार्‍या या गावात तब्बल 18 कोरोना रूग्ण आढळून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

एवढ्या मोठया प्रमाणावर गावात रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अगोदर फक्त 1 रूग्ण पॉझिटीव्ह आढळला होता. परंतू एकाच वेळेस 18 रूग्ण पॉझिटीव्ह झाल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

वडाळी ग्रामपंचायतीर्फे उपाययोजनेसाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात आली. गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, पोलिस निरिक्षक चंद्रकांत सरोदे, विस्तार अधिकारी सुरेश देवरे, पंचायत समिती सदस्य गिरीश जगताप यांनी भेट दिली.

प्रभारी सरपंच हिंमत सोनवणे व पोलिस पाटील गजेंद्रगीरी गोसावी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने कडक नियमांचे पालन करीत दिवस बंद ठेवावीत, सार्वजनिक गणेशोत्सवात हा शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, गणेशमुर्ती विक्री व्यवसायिकांनी मुर्ती घरून विक्री करावी तसे बोर्ड आपल्या दुकानासमोर लावावीत, गावात फवारणी करावी, गर्दी टाळावी, बँक व्यवहार अंतर्गत व्यवहार सुरू ठेऊन ग्राहकांसाठी बंद करावेत असे सुचवले.

सर्व 18 रूग्णांना विलगीकरण कक्ष मोहिदा त.श.येथे पाठविण्यात आले आहे. पोलिस प्रशासनातर्फे गावात बंदोबस्त करून नियमांचे पालन न करणार्‍या नागरीक, व्यापारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी देखील मागणी करण्यात आली. वडाळी गावाचा एकुण 17 खेड्या गावांसोबत थेट संपर्क येतो. त्यांमुळे आसपासच्या गावातील लोक देखील आता चिंतेत आहेत. गावात एकाच दिवशी 18 कोरोना रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात वडाळी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु पाहत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com