जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी कोविड रुग्णालयांना दिलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनची आकडेवारी खोटी

प्रशासनाने हिशोब द्यावाः खा.डॉ.हीना गावितांची मागणी
जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी कोविड रुग्णालयांना दिलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनची आकडेवारी खोटी

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी रुग्णालयांना दिल्या गेलेल्या इंजेक्शनची आकडेवारी खोटी असून त्याचा हिशोब देण्यात यावा, अशी मागणी खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी व अन्न व औषधी प्रशासन अधिकार्‍यांमुळेच जिल्हयात रेमडिसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

याबाबत माहिती देतांना खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. नागरिकांना रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी फिरफिर करावी लागत आहे. मात्र, इंजेक्शनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे दोन दिवसांपासून जिल्हयातील विविध खाजगी कोविड रुग्णालयांना दिल्या जाणार्‍या इंजेक्शनची आकडेवारी देण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात तेवढे इंजेक्शन संबंधित रुग्णालयाला प्राप्तच झाले नसून जिल्हा प्रशासनाकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे.

संबंधित रुग्णालयांनी दिलेल्या पत्रात त्यांना प्राप्त इंजेक्शन व जिल्हा रुग्णालयाकडून दिली गेलेल्या आकडेवारीत तफावत असून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही खा.डॉ.गावितांनी केला आहे.

खा.गावित पुढे म्हणाल्या, रोटरी वेलनेस सेंटर एक दुकान असून तेथे इंजेक्शन प्राप्त व्हावे यासाठी खुद्द जिल्हाधिकार्‍यांनीच कंपन्यांना पत्र दिले आहे. तसेच विविध औषध निर्मिती करणार्‍या कंपन्यांशी संपर्क साधला असता जिल्ह्यात एक-दोन दिवसाआड काही-ना-काही इंजेक्शन प्राप्त होत आहेत. याचा हिशेब नाही. मग हे इंजेक्शन गेले कुठे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

अन्न, औषध प्रशासन अधिकारी मोजक्याच वितरकांकडे जावून तपासणी करीत आहेत. काही वितरकांकडे तपासणीच करण्यात येत नसल्याने अन्न, औषध प्रशासन अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांमुळे रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याचा आरोपही खा.डॉ.गावित यांनी केला.

जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता असतांना याबाबत कधीही जिल्हाधिकार्‍यांनी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकांमध्ये विषय उपस्थित केला नाही किंवा केला असेल तर पुढे त्याचा आढावा घेण्यात आला नसल्याचे त्या म्हणाल्या. लोकप्रतिनिधींच्या नावावर जिल्हाधिकारी स्वत:चे अपयश लपवत असल्याचेही डॉ.गावित यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com